अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 10:15 IST2025-06-18T10:14:12+5:302025-06-18T10:15:02+5:30
Israel-Iran Conlfict: इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, अमेरिकेने ३० लढाऊ विमानं रवाना केल्याने तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने बिनशर्त शरणागती स्वीकारावी, असा सल्ला दिल्याने इस्राइल आणि इराणमधील संघर्ष आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
इस्राइल आणि इराण यांच्यातील संघर्षाने आता भीषण रूप धारण केलं आहे. सहा दिवस उलटल्यानंतरही दोन्ही पैकी एकही देश संघर्ष थांबवण्याबाबत कुठलेही सकारात्मक पाऊल उचलताना दिसत नाही आहे. त्यातच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्राइलविरोधात युद्दाची घोषणा केली आहे. तसेच इराणने इस्राइललची राजधानी असलेल्या तेल अवीववर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला आहे. तर इस्राइलनेही इराणची राजधानी असलेल्या तेहरानला लक्ष्य केलं आहे. या सर्व घडामोडींदरम्यान, अमेरिकेने ३० लढाऊ विमानं रवाना केल्याने तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने बिनशर्त शरणागती स्वीकारावी, असा सल्ला दिल्याने इस्राइल आणि इराणमधील संघर्ष आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.
इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ या सोशल मीडियावर लिहिले की, ‘’UNCONDITIONAL SURRENDER’’. यावरून ट्रम्प यांनी या संघर्षात इराणबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत संकेत मिळत आहेत.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याबाबतही कठोर भाषेचा अवलंब करत त्यांनी इशारा दिला आहे. इराणचे तथाकथित सर्वोच्च नेते कुठे आहेत, हे आम्हाला अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्यांना लक्ष्य करणं अगदी सोपं आहे. मात्र सध्यातरी ते अगदी सुरक्षित आहेत. आम्ही त्यांना मारणार नाही, किमान सध्यातरी मारणार नाही. मात्र क्षेपणास्त्रांद्वारे होणाऱ्या हल्ल्यात नागरिकांना लक्ष्य केलं जावं, तसेच अमेरिकन सैनिकांना लक्ष्य केलं जाणं हे आम्हाला मान्य नाही. आता आमचा संयम संपत आहे.
यादरम्यान, मागच्या तीन दिवसांमध्ये किमान अमेरिकेची ३० लढाऊ विमानं ही अमेरिकेच्या विविध तळांवरून युरोपमध्ये पाठवण्यात आली आहेत. ही सर्व विमाने सैन्यदलांमधील टँकर विमानं आहेत. ज्यांचा वापर लढाऊ विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी होतो.
दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याले इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी केराची टोपली दाखवली आहे. तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांची इस्त्राइलने हत्या केल्यानंतरही युद्ध कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे. The battle begins, म्हणजेच युद्द सुरू झाले आहे असे खामेनी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.