"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 09:15 IST2025-06-24T09:15:15+5:302025-06-24T09:15:35+5:30
Israel-Iran Ceasefire Update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राइल आणि इराणमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा केल्याने गेल्या १२ दिवसांपासून इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता थांबेल, असी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केली आहे.

"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
इस्राइलने ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्यानंतर इराण आणि इस्राइलमध्ये मागच्या १२ दिवसांपासून भीषण संघर्ष सुरू होता. यादरम्यान, दोन्ही देशांकडून एकमेकांवर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये दोन्हीकडे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. अखेरीस भारतीय वेळेनुसार आज पहाटे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा केल्याने गेल्या १२ दिवसांपासून इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता थांबेल, असी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केली आहे.
इराणचे परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अराघची यांनी युद्धविरामाबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, इराणविरोधातील हे युद्ध इस्राइलने सुरू केले आहे, हे आम्ही वारंवार स्पष्ट केले आहे. तसेच युद्धविराम किंवा लष्करी कारवाया थांबवण्याबाबत अद्याप कुठल्याही वाटाघाटी झालेल्या नाहीत. जर इस्राइली सरकारने इराणच्या जनतेविरोधात सुरू केलेले बेकायदेशीर हल्ले सकाळी ४ वाजण्याआधी बंद केले तर त्यानंतर प्रत्युत्तरदाखल कारवाई करण्याचा आमचाही कुठला विचार नसेल. आमच्या लष्करी मोहिमेच्या समाप्तीबाबत अंतिम निर्णय सर्वात शेवटी घेतला जाईल.
दरम्यान, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध संपल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी केली होती. इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधीसाठी एकमत झाले आहे. पुढील १२ तासांत १२ दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध संपलं असं अधिकृतरीत्या समजलं जाईल.१२ दिवसांच्या या युद्धाला जग सलाम करेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.