इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:13 IST2026-04-07T13:12:25+5:302026-04-07T13:13:48+5:30
Israel IDF Warning Iran: इराणमध्ये आणीबाणीची स्थिती! इस्रायलच्या रेल्वेवरील हल्ल्याच्या धमकीने तेहरानमध्ये मोठी खळबळ; नागरिकांची पळापळ

इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
इस्रायली संरक्षण दलाने इराणच्या रेल्वे नेटवर्कला लक्ष्य करण्याची थेट धमकी दिल्यानंतर संपूर्ण इराणमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तेहरानमधील रेल्वे स्थानकांवर आणि प्रमुख परिवहन केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी आणि अफरातफरी पाहायला मिळत आहे. इस्रायलची ही चेतावणी केवळ 'धमकी' नसून ती प्रत्यक्षात उतरण्याची दाट शक्यता असल्याने इराणी जनतेमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
मंगळवारी रात्री ९ वाजेपर्यंत (स्थानिक वेळ) कोणत्याही इराणी नागरिकाने ट्रेनने प्रवास करू नये किंवा रेल्वे ट्रॅकच्या आसपास जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश इस्रायलने दिले आहेत. रेल्वे मार्गांचा वापर करणे आता थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
तेहरानमधील स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणला यापूर्वीही अशा धमक्या मिळाल्या आहेत. मात्र, यावेळेस परिस्थिती वेगळी आहे. याआधी इस्रायलने दिलेल्या अनेक इशाऱ्यांचे रूपांतर काही तासांतच भीषण हवाई हल्ल्यांमध्ये झाले आहे, हा अनुभव इराणी जनतेच्या पाठीशी आहे. त्यामुळेच रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तातडीने सोडून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे.
जनजीवन विस्कळीत होण्याचे संकट
जर इस्रायलने इराणच्या रेल्वे स्थानकांना किंवा रुळांना लक्ष्य केले, तर देशाची संपूर्ण रसद आणि दळणवळण व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रेल्वे हे इराणमधील लांब पल्ल्याच्या प्रवासाचे मुख्य साधन असल्याने, या हल्ल्याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि लष्करी वाहतुकीला बसू शकतो. सध्या संपूर्ण इराणमध्ये अराजकतेसारखी स्थिती निर्माण झाली असून प्रशासन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
IRGC कडून ट्रम्प यांच्या धमक्यांना प्रत्युत्तर
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना केराची टोपली दाखवली आहे. "ट्रम्प आपल्या लष्करी अपयशांना झाकण्यासाठी अशा पोकळ धमक्या देत आहेत," असे आयआरजीसीचे प्रवक्ते इब्राहिम जुलफकारी यांनी म्हटले आहे. तसेच, जर अमेरिकेने गैर-लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले, तर इराणचा पलटवार हा आधीपेक्षा अधिक भीषण आणि मोठ्या स्तरावर असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.