अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रयत्न निष्फळ; गाझामध्ये पुन्हा युद्ध पेटले, इस्रायली सैन्याचा हवाई हल्ला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 17:01 IST2025-10-19T17:00:44+5:302025-10-19T17:01:23+5:30
Israel Hamas War: मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे.

अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रयत्न निष्फळ; गाझामध्ये पुन्हा युद्ध पेटले, इस्रायली सैन्याचा हवाई हल्ला...
Israel Hamas War: मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर अवघ्या एका दिवसात इस्रायली संरक्षण दलाने (IDF) गाझामध्ये हवाई हल्ला केला आहे. हा हल्ला राफा परिसरात इस्रायली सैनिकांवर झालेल्या गोळीबाराचा प्रत्युत्तरात्मक कारवाई मानली जात आहे.
IDF कडून एअर स्ट्राईक
इस्रायलच्या ‘चॅनल 12’ च्या अहवालानुसार, IDF ने हा हल्ला गाझाच्या राफा भागात केला आहे. अमेरिकेने नुकताच हमासवर गाझा पट्टीतील नागरी वस्तीवर हल्ल्याची योजना आखल्याचा आरोप केला होता.
‘टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिलेल्या माहितीनुसार, हा हवाई हल्ला त्या घटनांच्या प्रत्युत्तरात करण्यात आला, ज्या वेळी राफा भागात असलेल्या एका बोगद्यातून बाहेर आलेल्या हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली सैनिकांवर गोळीबार केला होता.
IDF च्या म्हणण्यानुसार, 17 ऑक्टोबर 2025 रोजी हा गोळीबार झाला होता. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, इस्रायली लष्कराने यानंतर प्रत्युत्तराशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला होता.
अमेरिकेचा सीजफायर प्रयत्न फसला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच गाझामध्ये सीजफायर घडवून आणला होता. मात्र, काही दिवसांतच इस्रायल आणि हमासमधील संघर्ष पुन्हा पेटला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालांनुसार, हमास सीजफायर तोडून नव्या हल्ल्याची योजना आखत होता, ज्यामुळे परिस्थिती पुन्हा बिघडली आहे.
नेतान्याहूंची ठाम भूमिका
शनिवारी (18 ऑक्टोबर 2025) नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की, “गाझामधील युद्ध तेव्हाच संपेल, जेव्हा हमासचे सर्व शस्त्रसाठे नष्ट होतील आणि संघटना पूर्णपणे निःशस्त्र होईल.”