डोळ्यात आनंदाश्रू; पाहताच एकमेकांना मिठी मारली...738 दिवसांनंतर हमासच्या कैदेतून इस्रायली बंधकांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:40 IST2025-10-13T16:40:10+5:302025-10-13T16:40:36+5:30
Israel-Hamas War: हमासने इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्यात सुमारे 1200 लोक ठार झाले होते, तर २५१ लोकांना बंधक बनवण्यात आले होते.

डोळ्यात आनंदाश्रू; पाहताच एकमेकांना मिठी मारली...738 दिवसांनंतर हमासच्या कैदेतून इस्रायली बंधकांची सुटका
Israel-Hamas War: इस्रायलमध्ये सध्या जल्लोष सुरू आहे. कारणही मोठं आहे. तब्बल ७३८ दिवसांनंतर हमासच्या ताब्यातील २० इस्रायली बंधकांची सुटका झाली आहे. हे बंधक दोन टप्प्यांत सोडले गेले. पहिल्या टप्प्यात ७ आणि दुसऱ्या टप्प्यात १३ बंधकांची सुटका करण्यात आली.
पहिल्या गटातील बंधकांची सुटका झाल्यानंतर इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचे काही फोटो प्रसिद्ध केले. त्या फोटोंमध्ये हे बंधक इस्रायली सैनिकांना मिठी मारताना, डोळ्यांतून अश्रुरूपी आनंद आणि दिलासा व्यक्त करताना दिसत आहेत.
सुटका झाल्यानंतर चेहऱ्यांवर आनंद खुलला
फोटोंमध्ये बर्मन बंधू एकमेकांना मिठी मारताना, तर गिल्बोआ-डाला सैनिकांना भेटताना दिसतात. हे दोघे दोन वर्षांपूर्वी नोव्हा फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. तो कार्यक्रम गाझापासून काहीच मैलांवर होता. त्याच वेळी हमासने हल्ला करुन त्यांचे अपहरण केले होते.
For the first time in two years, Gali, Ziv, Eitan, Matan, Guy & Alon are safe - back in Israel, surrounded by love.
— Israel Foreign Ministry (@IsraelMFA) October 13, 2025
We’ve waited for you for so long.
There’s no greater joy than saying: Welcome 🇮🇱home. pic.twitter.com/IftIUgeuZj
सुटका झालेल्यांमध्ये एतान मोर याचाही समावेश आहे. ते ऑक्टोबर २०२३ मध्ये दक्षिण इस्रायलमध्ये झालेल्या हमासच्या मोठ्या हल्ल्यादरम्यान नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. त्या हल्ल्यात सुमारे १,२०० लोक ठार झाले आणि २५१ लोकांना बंधक बनवण्यात आले होते.
कैद्यांची अदलाबदल
आजपर्यंत ७ ऑक्टोबर २०२३ च्या हमल्यात अपहृत २० जिवंत बंधकांची सुटका करण्यात आली आहे. हमासने २६ मृत बंधकांचे मृतदेह परत द्यायचे आहेत, परंतु ते कधी परत केले जातील, याची खात्रीशीर माहिती नाही. या सुटकेच्या बदल्यात इस्रायल २५० पॅलेस्टिनी कैदी मुक्त करणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची इस्रायल भेट
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायलला पोहोचले आहेत. तेथे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्राध्यक्ष आइजॅक हर्जोग यांनी त्यांचे स्वागत केले. ट्रम्प आजच मुक्त झालेल्या बंधकांशी भेटणार आहेत.