इस्त्रायल-हमासमध्ये 'डेडबॉडी वॉर' सुरू; 2 च्या बदल्यात इस्रायलने पाठवले 30 पॅलेस्टिनींचे मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:25 IST2025-10-31T17:25:47+5:302025-10-31T17:25:55+5:30
Israel-Hamas War: युद्धविराम जाहीर झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी मृतांची देवाणघेवाण सुरू आहे.

इस्त्रायल-हमासमध्ये 'डेडबॉडी वॉर' सुरू; 2 च्या बदल्यात इस्रायलने पाठवले 30 पॅलेस्टिनींचे मृतदेह
Israel-Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामानंतर आता परिस्थिती हळुहळू रुळावर येत आहे. दोन्ही बाजूंनी शांतता चर्चेच्या काळात “मृतदेहांची देवाणघेवाण” सुरू केली आहे. हमासने दोन मृत बंधकांचे अवशेष इस्त्रायलला परत दिल्यानंतर, इस्त्रायली सैन्याने किमान 30 पॅलेस्टिनींचे मृतदेह परत पाठवली. मात्र, यामुळे परिस्थिती पुन्हा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हमासने परत दिले दोन मृतदेह
काही दिवसांपूर्वी इस्त्रायलने हमासकडून बंधक परत मिळवण्यात होणाऱ्या विलंबावरुन गाझावर तीव्र हवाई हल्ले केले होते, ज्यात शेकडो नागरिक ठार झाले. या हल्ल्यानंतर युद्धविराम तुटला होता. इस्त्रायलने आरोप केला की, हमास जाणीवपूर्वक बंधकांना परत देण्यात विलंब करत आहे. यानंतर गुरुवारी दुसऱ्यांदा युद्धविराम जाहीर करण्यात आला. आता दोन्ही बाजूंनी मृतदेहाची देवाणघेवाण सुरू आहे.
2 च्या बदल्यात 30 मृतदेहांची परतफेड
गाझामधील रुग्णालय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हमासकडून दोन बंधकांचे अवशेष परत आल्यानंतर इस्त्रायलने 30 पॅलेस्टिनींचे मृतदेह परत दिले. ही अदलाबदल दुसऱ्या युद्धविरामानंतर करण्यात आली. 10 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या युद्धविरामाचा उद्देश इस्त्रायल आणि हमास यांच्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक घातक आणि विध्वंसक संघर्ष समाप्त करणे हा आहे. मात्र आता “डेडबॉडी वॉर” सुरू झाल्याने शांततेची प्रक्रिया पुन्हा धोक्यात आली आहे.
दोन्ही देशांतील वातावरण तापले
गाझा रुग्णालय सूत्रांच्या मते, इस्त्रायलने पाठवलेले मृतदेह पॅलेस्टिनी नागरीकांचे आहेत, जे अलीकडील लढाईत मारले गेले होते. युद्धामुळे शेकडो सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. आता इस्रायल मोठ्या प्रमाणात मृतदेह पाठवत असल्यामुळे स्थानिकांमध्ये संताप वाढला असून, युद्धविराम खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.