बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:00 IST2025-06-25T11:58:28+5:302025-06-25T12:00:10+5:30
Israel America Iran War: इराणच्या समृद्ध युरेनियमचा साठा असलेल्या सेंट्रीफ्युजना धक्काही लागला नसल्याचा पेंटागॉनचाच रिपोर्ट व्हायरल झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी सारवासारव करत तो खोटा रिपोर्ट असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा करूनही इराण आणि इस्रायलचे हल्ले काही काळ सुरुच होते. यानंतर मंगळवारी दुपारी दोन्ही देश युद्धविराम करण्यासाठी तयार असल्याची घोषणा करण्यात आली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतू, आता पुढचे टेन्शन सुरु झाले आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर तेथील तब्बल ४०० किलो शुद्धीकरण केलेले युरेनियम गायब झाले आहे.
इराणच्या समृद्ध युरेनियमचा साठा असलेल्या सेंट्रीफ्युजना धक्काही लागला नसल्याचा पेंटागॉनचाच रिपोर्ट व्हायरल झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी सारवासारव करत तो खोटा रिपोर्ट असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू, आता उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनीच एबीसी न्यूजला 400 किलोग्राम युरेनियम गायब झाल्याचे कबुल केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा साठा एवढा प्रचंड आहे की त्याद्वारे १० अणुबॉम्ब तयार करता येऊ शकतात.
हे युरेनियम सध्यातरी शु्द्धीकरणाच्या प्रक्रियेत आहे. ६० टक्के समृद्ध असून अणुब़ॉम्ब तयार करण्यासाठी ते ९० टक्के समृद्ध व्हावे लागते. हे दिलासा देणारे जरी असले तरी ६० ते ९० टक्क्यांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ तीन ते चार आठवडे लागतात. यामुळे हे गायब झालेले युरेनियम दुष्ट शक्तींच्या हाती लागले तर जगावर मोठे संकट येऊ शकते. इराण पुढील महिन्याभरात हे युरेनियम ९० टक्के समृद्ध करणारा होता, असा दावा करतच इस्रायल आणि अमेरिकेने हा हल्ला केला होता. इराणनेच हे युरेनियम हल्ला झालेल्या ठिकाणावरून हटविल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर गायब झालेल्या ९०० पौंड (सुमारे ४०० किलो) अत्यंत समृद्ध युरेनियमबाबत अमेरिका येत्या आठवड्यात इराणशी चर्चा करेल, असे वेन्स म्हणाले आहेत. तसेच फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमधील इराणी अणुऊर्जा केंद्रांना गंभीर नुकसान झाले आहे किंवा ते पूर्णपणे नष्ट झाले आहेत, परंतू आपण अचूक माहिती देऊ शकत नाही, असे वेन्स म्हणाले.