युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:19 IST2026-04-09T16:17:16+5:302026-04-09T16:19:06+5:30
Israel Attacks Lebanon: इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामाच्या चर्चा सुरू असतानाच, इस्रायलने लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला केला आहे. या कारवाईत हिजबुल्लाहचा नवीन प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सचिव अली युसूफ हर्षी ठार झाला आहे.

युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
लेबनॉनमध्ये इस्रायली लष्कराने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा नवीन प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सचिव अली युसूफ हर्षी याला ठार केले. विशेष म्हणजे, इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामाबाबत चर्चा सुरू असतानाच इस्रायलने हा मोठा प्रहार केला आहे.
इस्रायली संरक्षण दलाने बुधवारी रात्री बैरुत येथील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत भीषण हवाई हल्ले केले. या कारवाईत अली युसूफ हर्षी मारला गेल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हर्षी हा केवळ नईम कासिमचा पुतण्याच नव्हता, तर तो त्याचा अत्यंत विश्वासू सहकारी, सहाय्यक आणि वैयक्तिक सल्लागार म्हणूनही कार्यरत होता. कासिमच्या कार्यालयाचे दैनंदिन कामकाज आणि त्याच्या सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी हर्षी याच्या खांद्यावर होती.
काही आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, या हल्ल्याचा मुख्य हेतू हिजबुल्लाह प्रमुख नईम कासिम यालाच संपवण्याचा होता. मात्र, या हल्ल्यातून कासिम निसटण्यात यशस्वी झाला असला तरी, त्याचा उजवा हात मानला जाणारा हर्षी मारला गेल्याने संघटनेला मोठे खिंडार पडले आहे. हसन नसरल्लाच्या हत्येनंतर कासिमने हिजबुल्लाहची धुरा सांभाळली होती. दरम्यान, उत्तर लिटानी प्रदेशातून दक्षिण लिटानी प्रदेशात शस्त्रे आणि रॉकेट्सची वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे दोन महत्त्वाचे मार्ग आयडीएफने निकामी केले. दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या सुमारे १० शस्त्र-साठवणूक केंद्रांवर, लॉन्चर-स्थळांवर आणि मुख्यालयांवर एकाच वेळी हल्ले करण्यात आले. या मार्गांचा वापर हजारो रॉकेट्स आणि लाँचर्सच्या वाहतुकीसाठी केला जात असे, जे आता इस्रायलने रोखले आहेत.
युद्धविरामाच्या काळात तणाव वाढला
एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम घडवून आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू असताना, इस्रायलने लेबनॉनमध्ये केलेली ही आक्रमक कारवाई हिजबुल्लाहसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. नसरल्लाच्या हत्येनंतर कासिमची नियुक्ती झाली होती, मात्र आता त्याच्याही जवळच्या व्यक्तीवरही इस्रायलने निशाणा साधल्याने लेबनॉनमधील परिस्थिती अधिक स्फोटक झाली आहे.