पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करतेय? हमास अन् लष्कर कमांडर्समध्ये गुप्त बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:19 IST2026-01-07T12:12:12+5:302026-01-07T12:19:21+5:30
पाकिस्तानमध्ये हमास आणि लष्कर-ए-तोयबा यांच्यातील नवीन संबंध उघड झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये हमास कमांडर नाजी झहीर आणि लष्कर कमांडर रशीद अली संधू हे गुजरानवाला, पाकिस्तान येथील एका कार्यक्रमात भेटत असल्याचे दिसले.

पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करतेय? हमास अन् लष्कर कमांडर्समध्ये गुप्त बैठक
पाकिस्तानमध्ये हमास आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या संघटनांमध्ये एक नवीन संबंध निर्माण होत आहेत. काही दिवसापूर्वी गुजरानवाला, पाकिस्तान येथे हमासचे कमांडर नाजी झहीर आणि लष्कर-ए-तैयबाचा कमांडर रशीद अली संधू यांच्यातील बैठकीचा व्हिडीओ समोर आला.
लष्कर-ए-तैयबाचा राजकीय चेहरा मानल्या जाणाऱ्या पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ही बैठक झाली. नाजी झहीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर संधू पीएमएमएलचे नेते म्हणून उपस्थित होते.
हमास नेत्याचे पाकिस्तानशी कनेक्शन
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या काही आठवड्यांपूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये पाकव्याप्त काश्मीर मध्ये नाजी झहीर हा आला होता. तिथेच त्याने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरसह भारतविरोधी रॅलीला संबोधित केले होते.
पाकिस्तानशी त्यांचे संबंध जुने आहेत. जानेवारी २०२४ मध्ये त्यांनी कराचीला भेट दिली आणि कराची प्रेस क्लबमध्ये माध्यमांशी संवाद साधला. एप्रिल २०२४ मध्ये ते इस्लामाबादला आले, जिथे इस्लामाबाद हायकोर्ट बार असोसिएशनने त्यांचा सन्मान केला.