पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 09:42 IST2025-10-18T09:31:13+5:302025-10-18T09:42:46+5:30
अफगाणिस्तानसोबतच्या वादावर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.

पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
Pakistan VS Afghanistan: अफगाणिस्तानसोबत सीमावाद आणि हवाई हल्ल्यांमुळे वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. अत्यंत कठोर भूमिका घेत दोन्ही देशांतील जुन्या संबंधांचे पर्व आता संपले असून, पाकिस्तानात राहणाऱ्या अफगाण नागरिकांनी त्वरित मायदेशी परतावे, अशी सूचना ख्वाजा आसिफ यांनी शुक्रवारी दिली. "आता त्यांचे स्वतःचे सरकार आहे, आमची जमीन आणि संसाधने केवळ २५ कोटी पाकिस्तानी नागरिकांसाठी आहेत, असेही ख्वाजा आसिफ म्हणाले.
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर सीमेवर गोळीबार झाला आणि तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन दिवसांचा युद्धविराम दोहा येथील चर्चा संपेपर्यंत वाढवण्याचं ठरलं असतानाच पाकिस्तानने पक्तिका प्रांतात पुन्हा हवाई हल्ला केला, ज्यामुळे तालिबान अधिकारी प्रचंड संतापले असून, हा करार मोडल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर आसिफ यांनी उघडपणे सांगितले की, पाकिस्तानने आतापर्यंत अफगाणिस्तानला सीमापार दहशतवादाशी संबंधित ८३६ प्रोटेस्ट नोट पाठवले असून १३ मागण्या केल्या आहेत. पण आता काबूलला कोणतेही शिष्टमंडळ पाठवले जाणार नाही, तसेच शांततेची कोणतीही नवी मागणी केली जाणार नाही. "दहशतवाद जिथे पोसला जाईल, त्याला त्याची किंमत मोजावी लागेल," अशी थेट धमकी त्यांनी दिली.
या प्रकरणात आसिफ यांनी भारतालाही यामध्ये ओढले. तालिबान सरकार भारताच्या इशाऱ्यावर काम करत असून, पाकिस्तानविरुद्ध कट रचत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. "काबूलचे शासक आज भारताच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, जे कधीकाळी आमच्या आश्रयाला होते," असे आसिफ म्हणाले. सीमेवर अफगाणिस्तानने कोणताही चुकीचा प्रकार केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशाराही आसिफ यांनी दिला आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारताच्या दौऱ्यावर असतानाच पाकिस्तानने काबूलवर हवाई हल्ला केला होता. यावरून पाकिस्तानला दहशतवादी कारवायांपेक्षा भारत आणि अफगाणिस्तानची वाढती जवळीक अधिक सतावत असल्याचे स्पष्ट होते.
पाकिस्तानी हल्ल्यात ३ अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू
शुक्रवारी पाकिस्तानने डुरंड रेषेला लागून असलेल्या पक्तिका प्रांतातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये तीन अफगाण क्रिकेटपटूही मारले गेले तर सात जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानी हल्ल्यात आपल्या तीन क्रिकेटपटूंच्या मृत्युबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.