इराणची अमेरिकेला धमकी: होर्मुजनंतर बाब अल-मंडेब समुद्रधुनी बंद झाल्यास काय होईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 08:34 IST2026-03-27T08:32:30+5:302026-03-27T08:34:03+5:30

इराणने अमेरिकेला 'बाब अल-मंडेब' समुद्रधुनी ब्लॉक करण्याची धमकी दिली आहे. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक तेल पुरवठा आणि व्यापारावर काय परिणाम होईल?

Iran's threat to America: What will happen if the Bab al-Mandeb Strait is closed after Hormuz? | इराणची अमेरिकेला धमकी: होर्मुजनंतर बाब अल-मंडेब समुद्रधुनी बंद झाल्यास काय होईल?

इराणची अमेरिकेला धमकी: होर्मुजनंतर बाब अल-मंडेब समुद्रधुनी बंद झाल्यास काय होईल?

मध्यपूर्वेतील तणावाचा वणवा आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेण्याची चिन्हे दिसत आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून, इराणने अमेरिकेला थेट 'आर्थिक नाकेबंदी'ची धमकी दिली आहे. जर अमेरिकेने इराणच्या खार्ग बेटावर पुन्हा हल्ला केला, तर जगाचा महत्त्वाचा व्यापारी मार्ग असलेला 'बाब अल-मंडेब' सामुद्रधुनी पूर्णपणे ब्लॉक करू, असा इशारा इराणने दिला आहे. हा मार्ग बंद झाला तर केवळ अमेरिकाच नाही, तर भारत, युरोप आणि आशियातील अनेक देशांत इंधनासाठी हाहाकार माजू शकतो.

काय आहे इराणचा बॅटल प्लॅन?

इराणने अमेरिकेचा युद्धविराम प्रस्ताव फेटाळून लावत आपल्या अटी कडक केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिका आता इराणवर जमिनीवरून हल्ला करण्याची तयारी करत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने जागतिक अर्थव्यवस्थेची लाईफलाईन कापण्याची धमकी दिली आहे. इराणचे मित्र मानले जाणारे येमेनमधील हूती बंडखोर या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हूती बंडखोरांनी यापूर्वीच तांबड्या समुद्रात जहाजांना लक्ष्य करून आपली ताकद दाखवून दिली आहे.

हे 'अश्रुंचे द्वार' का आहे इतके महत्त्वाचे?

अरबी भाषेत 'बाब अल-मंडेब'चा अर्थ 'अश्रुंचे द्वार' असा होतो. हा मार्ग तांबड्या समुद्राला आखाती देशांशी आणि अरबी समुद्राशी जोडतो. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीपैकी तब्बल १२ टक्के वाहतूक याच मार्गावरून होते. दररोज सुमारे ८.८ दशलक्ष बॅरल तेल या अरुंद समुद्री मार्गातून जाते. दरवर्षी सुमारे १ ट्रिलियन डॉलरचा व्यापार याच मार्गावर अवलंबून आहे.

तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

जर इराणने हा मार्ग रोखला, तर मालवाहू जहाजांना आफ्रिका खंडाला वळसा घालून 'केप ऑफ गुड होप'वरून जावे लागेल. यामुळे प्रवासाचा काळ २० दिवसांवरून थेट ४० दिवसांवर जाईल. साहजिकच जहाजांचे भाडे वाढेल आणि त्याचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतींवर होईल. महागाईचा भडका उडाल्यास जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या दरीत लोटली जाऊ शकते.

तज्ज्ञांचे मत काय?

ट्युनिसमधील कोलंबिया ग्लोबल सेंटरचे संचालक युसूफ शरीफ यांच्या मते, इराणची ही एक 'थ्री-स्टेप' रणनीती आहे. आधी 'होर्मुझ'ची नाकेबंदी, मग लेबनॉनच्या माध्यमातून इस्रायलचे लक्ष भरकटवणे आणि आता हूती बंडखोरांच्या मदतीने 'बाब अल-मंडेब' बंद करणे. जर इराण आणि हूती पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले, तर हा समुद्री मार्ग युद्धभूमी बनेल आणि जगाला मोठ्या उर्जा संकटाचा सामना करावा लागेल.

Web Title : ईरान की अमेरिका को धमकी: बाब अल-मंडेब जलडमरूमध्य बंद होने पर क्या होगा?

Web Summary : ईरान ने अमेरिका पर हमला होने पर बाब अल-मंडेब जलडमरूमध्य को बंद करने की धमकी दी है, जिससे वैश्विक तेल आपूर्ति और व्यापार प्रभावित हो सकता है। इससे ईंधन की कीमतें बढ़ सकती हैं और आर्थिक मंदी आ सकती है, विशेषज्ञों ने ऊर्जा संकट की चेतावनी दी है।

Web Title : Iran threatens America: Closure of Bab al-Mandeb Strait consequences?

Web Summary : Iran threatens to block Bab al-Mandeb Strait if attacked, impacting global oil supply and trade. This could raise fuel prices and trigger economic recession, experts warn of a potential energy crisis.