इराणचा भीषण पलटवार! अमेरिकेचे ६ सैनिक ठार, रडार यंत्रणा अन् हँगर उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 11:18 IST2026-03-26T11:17:54+5:302026-03-26T11:18:31+5:30
इराणने आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर एकामागून एक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले चढवत मोठा विध्वंस घडवून आणला आहे.

इराणचा भीषण पलटवार! अमेरिकेचे ६ सैनिक ठार, रडार यंत्रणा अन् हँगर उद्ध्वस्त
मध्य आशियातील तणावाने आता भीषण युद्धाचे रूप धारण केले आहे. इराणने आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर एकामागून एक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले चढवत मोठा विध्वंस घडवून आणला आहे. या हल्ल्यांमध्ये कुवैतमध्ये अमेरिकेचे ६ सैनिक ठार झाले असून, अनेक महत्त्वाचे लष्करी तळ मातीमोल झाले आहेत. 'न्यूयॉर्क टाइम्स'ने प्रसिद्ध केलेल्या एका ताज्या अहवालात या विध्वंसाचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
कुवैतमध्ये सर्वाधिक नुकसान; ६ सैनिकांचा मृत्यू
इराणच्या सीमेला लागून असलेल्या कुवैतमध्ये अमेरिकेला सर्वात मोठा फटका बसला आहे. येथील शुएबा बंदर परिसरात असलेल्या अमेरिकन लष्करी तळावर इराणने अचूक नेम धरला. या हल्ल्यात अमेरिकेचे 'टॅक्टिकल ऑपरेशन सेंटर' पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, ६ अमेरिकन सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय अली अल सलेम एअर बेसवर झालेल्या हल्ल्यात विमानांचे हँगर जमीनदोस्त झाले आहेत, तर कॅम्प बुहरिंगमधील इंधन साठे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.
कतार आणि बहरीनमध्ये रडार यंत्रणा निकामी
इराणने केवळ कुवैतच नव्हे, तर कतार आणि बहरीनलाही लक्ष्य केले आहे. कतारमधील अल उदेद हा अमेरिकेचा मध्य आशियातील सर्वात मोठा एअर बेस मानला जातो. येथे इराणने अमेरिकेची अर्ली वॉर्निंग रडार सिस्टीम पूर्णपणे नष्ट केली आहे. यामुळे अमेरिकेची या भागातील टेहळणी क्षमता धोक्यात आली आहे. दुसरीकडे, बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकन नौदलाच्या ५ व्या ताफ्याच्या मुख्यालयावरही हल्ला झाला असून, यामुळे नौदलाच्या कारवायांना मोठा खिळ बसण्याची शक्यता आहे.
सौदी अरेबियातही मिसाइलचा वर्षाव
सौदी अरेबियातील 'प्रिन्स सुल्तान' एअर बेसवरही इराणने ड्रोन आणि मिसाइलचा पाऊस पाडला. या हल्ल्यात अमेरिकेची संवाद यंत्रणा आणि इंधन भरणारी विमाने निकामी झाली आहेत. हे तळ रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असल्याने अमेरिकेला झालेला हा घाव अत्यंत खोल मानला जात आहे.
युद्धाची ठिणगी आणि जागतिक चिंता
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात आता दोन्ही बाजूंकडून टोकाची पावले उचलली जात आहेत. इराणने घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण आखाती क्षेत्रात युद्ध अधिक भडकण्याची चिन्हे आहेत. या हल्ल्यांमुळे जागतिक तेल पुरवठा आणि विमान वाहतुकीवरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.