पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यात इराणची एन्ट्री; परराष्ट्र मंत्र्यांनी केली 'ही' मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 10:18 IST2026-02-26T10:18:11+5:302026-02-26T10:18:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्रायलच्या दोन दिवसांच्या महत्त्वपूर्ण अधिकृत दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यात इराणची एन्ट्री; परराष्ट्र मंत्र्यांनी केली 'ही' मोठी मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्रायलच्या दोन दिवसांच्या महत्त्वपूर्ण अधिकृत दौऱ्यावर आहेत. या ऐतिहासिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचा कट्टर शत्रू मानल्या जाणाऱ्या इराणने भारताकडे एक मोठे आवाहन केले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आशा व्यक्त केली आहे की, पंतप्रधान मोदी या दौऱ्यात पॅलेस्टाईनचा मुद्दा उपस्थित करतील आणि तेथील लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवतील.
भारत आमचा जुना मित्र : इराण
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एका मुलाखतीत भारताचे कौतुक करताना म्हटले की, "भारत आणि इराणचे संबंध ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण आहेत. भारत आमचा एक चांगला मित्र आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही भागीदारी भविष्यातही अशीच वृद्धिंगत होत राहील." अराघची यांनी यावेळी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी असलेल्या आपल्या वैयक्तिक मैत्रीचाही उल्लेख केला.
पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर मोदींनी बोलावे!
गाझा पट्टीतील परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना अराघची म्हणाले, "इस्रायलने संपूर्ण गाझा उद्ध्वस्त केला आहे. ७५ हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत, जे नरसंहारापेक्षा कमी नाही. पंतप्रधान मोदी सध्या इस्रायलमध्ये आहेत, त्यामुळे त्यांनी पॅलेस्टिनी जनतेच्या अधिकारांबद्दल भाष्य करावे, अशी आमची अपेक्षा आहे." भारताने या क्षेत्रात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी आपली सकारात्मक आणि रचनात्मक भूमिका बजावावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी बुधवारी इस्रायलच्या संसदेला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या हल्ल्याचा निषेध करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताचे धोरण स्पष्ट असून आपण कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. गाझा शांतता उपक्रमाचे स्वागत करत त्यांनी या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होणे गरजेचे असल्याचे देखील म्हटले.
पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. एकीकडे इस्रायलसोबतचे संरक्षण आणि धोरणात्मक संबंध मजबूत होत असताना, दुसरीकडे इराणने केलेल्या या आवाहनाकडे जागतिक समुदायाचे लक्ष लागले आहे.