इराणी खेळाडूंचा राष्ट्रगीतास नकार; जिवाची भीती! इराणच्या रणरागिणींची ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक बंडखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 09:28 IST2026-03-12T09:27:43+5:302026-03-12T09:28:46+5:30

इराणच्या महिला खेळाडूंनी आपल्याच देशाचं राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला आणि त्या शांतपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या या मूक निषेधानं सर्वांनाच धक्का बसला.

Iranian players refuse to stand for national anthem; Fear for their lives! Historic rebellion by Iranian female fighters in Australia | इराणी खेळाडूंचा राष्ट्रगीतास नकार; जिवाची भीती! इराणच्या रणरागिणींची ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक बंडखोरी

इराणी खेळाडूंचा राष्ट्रगीतास नकार; जिवाची भीती! इराणच्या रणरागिणींची ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक बंडखोरी

स्थळ ऑस्ट्रेलिया. गोल्ड कोस्टमधील सीबस सुपर स्टेडियम. आशियाई फुटबाॅल स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना. इराण आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडू मैदानात एकमेकांविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहेत. नियमाप्रमाणे सामन्यापूर्वी दोन्ही देशांचं राष्ट्रगीत वाजवलं जातं आणि खेळाडू ते गातात. संकेताप्रमाणे यावेळीही तसंच राष्ट्रगीत वाजवलं गेलं. मात्र, यावेळी एक अत्यंत आश्चर्यजनक आणि धक्कादायक घटना घडली. इराणच्यामहिला खेळाडूंनी आपल्याच देशाचं राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला आणि त्या शांतपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या या मूक निषेधानं सर्वांनाच धक्का बसला. या महिला खेळाडूंची ही धाडसी कृती सध्या जगभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे, पण त्यांची हीच कृती आता त्यांच्या प्राणांवरही बेतू शकते.

या घटनेनंतर इराणमधील सरकारी माध्यमांनी या खेळाडूंवर कठोर शब्दांत टीका केली. एका सरकारी टेलिव्हिजन अँकरनं तर या महिला खेळाडूंना ‘युद्धकाळातील गद्दार’ असं संबोधलं. इराणमध्ये देशद्रोह हा गंभीर गुन्हा मानला जातो आणि संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाते. त्यामुळे या खेळाडू परत इराणमध्ये गेल्यास त्यांना अत्यंत कठोर शिक्षांचा सामना करावा लागू शकतो.

अमेरिका आणि इस्रायलनं २८ फेब्रुवारीला इराणविरुद्ध युद्ध सुरू केलं. त्यानंतर दोनच दिवसांत ऑस्ट्रेलियात ही घटना घडली. इराणच्या महिला फुटबॉलपटूंनी केलेली ही बंडखोरी आता त्यांच्या जिवावरचं संकट बनली आहे. हे प्रकरण केवळ क्रीडाक्षेत्रापुरतं मर्यादित न राहता राजकारण, मानवाधिकार आणि महिलांच्या स्वातंत्र्याशी जोडलं गेलं आहे. या घटनेनंतर लगेच स्टेडियमबाहेर अनेक आंदोलक जमले. त्यांनी ढोल वाजवत आणि घोषणा देत इराणी महिला खेळाडूंच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. ‘सेव्ह अवर गर्ल्स’ आणि ‘इराणमध्ये सत्ताबदल करा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी या खेळाडूंच्या सुरक्षेची मागणी केली.

काही खेळाडूंनी इराणला परत गेल्यास स्वतःच्या जिवाला धोका असल्याचं सांगत ऑस्ट्रेलियात आश्रय मागितला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या खेळाडूंना ऑस्ट्रेलियानं आश्रय द्यावा असं आवाहन केलं आहे. किमान सात खेळाडूंनी आश्रयासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी पाच खेळाडूंना ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी मानवीय व्हिसा देऊन सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. या खेळाडूंमध्ये झहरा घनबरी, झहरा सरबली, फातेमे पसांदीदेह, मोना हमुदी आणि अतफे रमझानझादेह यांचा समावेश आहे. तथापि, संघातील सर्वच खेळाडूंनी आश्रय मागितलेला नाही. काही खेळाडू अजूनही ऑस्ट्रेलियात आहेत, तर काही दुसऱ्या देशात रवाना झाल्या आहेत किंवा इराणला परतण्याची तयारी करत आहेत.

या घटनेनंतर इराणचे निर्वासित क्राउन प्रिन्स रझा पहलवी यांनी या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत ऑस्ट्रेलियन सरकारला त्यांना आश्रय देण्याचं आवाहन केलं आहे. अनेक मानवाधिकार कार्यकर्ते, काही पाश्चात्त्य राजकारणी तसंच ‘हॅरी पॉटर’ मालिकेच्या लेखिका जे. के. रोलिंग यांनीही हीच भूमिका घेतली आहे. त्यांच्या मते, राष्ट्रगीत गाण्यास नकार देणं ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कृती असून, त्यासाठी खेळाडूंना शिक्षा होऊ नये. ऑस्ट्रेलियानं काही खेळाडूंना मानवीय व्हिसा दिल्यामुळे इराण आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातही राजनैतिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title : ईरानी खिलाड़ियों ने राष्ट्रगान का तिरस्कार किया; जान का खतरा, शरण मांगी।

Web Summary : ऑस्ट्रेलिया में ईरानी महिला फुटबॉलरों ने प्रतिघात के डर से राष्ट्रगान गाने से इनकार कर दिया। वतन में आलोचना का सामना करते हुए, कुछ ने खतरे का हवाला देते हुए शरण मांगी। ऑस्ट्रेलिया ने कुछ को मानवीय वीजा दिया, जिससे राजनयिक तनाव पैदा हो गया।

Web Title : Iranian footballers refuse anthem; fear for lives, seek asylum.

Web Summary : Iranian women footballers in Australia refused to sing their national anthem, fearing repercussions. Facing criticism at home, some sought asylum, citing danger. Australia granted humanitarian visas to some, sparking diplomatic tension.