Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 05:47 IST2026-04-13T05:46:48+5:302026-04-13T05:47:15+5:30
Iran War: गेल्या काही आठवड्यांपासून रशिया आणि चीन आखातातील इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध पाहात आहे. हे युद्ध इराणच्या विनाशावर पोहोचले असताना १४ दिवसांचा युद्धविराम लागू झाला. यात दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केला. पण या युद्धाचा खरा फायदा रशिया आणि चीनला मिळाला.

Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
'जेव्हा तुमचा शत्रू चूक करत असतो, तेव्हा त्याला कधीही अडवू नका', असे जगजेत्ता फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्टचे रणनीती सूत्र होते. गेल्या काही आठवड्यांपासून रशिया आणि चीन आखातातील इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध पाहात आहे. हे युद्धइराणच्या विनाशावर पोहोचले असताना १४ दिवसांचा युद्धविराम लागू झाला. यात दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केला. पण या युद्धाचा खरा फायदा रशिया आणि चीनला मिळाला. म्हणजे अमेरिका या महासत्तेची ताकद कमी करण्यात या देशांना यश आले आहे.
या संघर्षात चीन- रशियाने अत्यंत सावध भूमिका घेतली. दोघांशी मित्र असलेल्या इराणला पाठिंबा देण्याचे टाळत स्वतःचे नुकसान टाळले. त्याऐवजी, त्यांनी गुप्तचर माहिती आणि राजनैतिक पाठिंबा दिला. सारांश असा की २१ व्या शतकातील महासत्ता कोण या स्पर्धेत अमेरिकेचे नुकसान झाले.
अमेरिका ठरला 'बेभरवशाचा रक्षक'
प. आशियातील राजकीय, आर्थिक फायद्यांसाठी अमेरिकेला नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. २०२० पर्यंत अमेरिकेचे प्राधान्य चीन आणि रशियाचा प्रभाव रोखणे हे होते. मात्र, शी जिनपिंग आणि पुतिन यांनी या प्रदेशात वावर वाढवत आणला. रशियाने सीरियातील असाद राजवटीचा पाडाव झाल्यानंतर इराणशी जवळीक साधली, तर चीनने २०२३ मध्ये सौदी अरेबिया आणि इराणमधील संबंध सुधारण्यासाठी मध्यस्थी करत आपले राजकीय वजन वाढवले. आता इराण युद्धात आखाती देशांवर हल्ले झाल्याने अमेरिकेची प्रतिमा एक 'बेभरवशाचा रक्षक' अशी झाली. ती अमेरिकेला महागात पडेल.
ट्रम्पचे धोरणात्मक उद्दिष्टांकडे दुर्लक्ष
इराक व अफगाणिस्तानमधील प्रचंड खर्चिक युद्धानंतर अमेरिकेने या प्रदेशातून माघार घेतली होती. मात्र, इराणविरुद्ध युद्ध पुकारण्याचा ट्रम्प यांचा निर्णय त्यांच्याच नोव्हेंबर २०२५ च्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाच्या विरोधात होता. ज्यात इंडो-पॅसिफिक क्षेत्राला प्राधान्य देण्याचे ठरले होते. मात्र ट्रम्प यांनी नाटोशी चर्चा न करता इराणविरोधात युद्ध सुरू करून नाटोच्या हितांकडे दुर्लक्ष केले. परिणामी त्याचा थेट फायदा रशिया आणि चीनला होत आहे.
तेलकिमतीचा फायदा
इराणने 'होर्मुझची सामुद्रधुनी' बंद केल्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम झाला. याचा रशियाला फायदा झाला, कारण तेलाच्या वाढत्या किमतींमुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. चीनने स्वतःचे तेल साठे शोधत सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक बॅटरीसारख्या पर्यायांवर भर दिला आहे. त्यामुळे जागतिक ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी चीन, अमेरिकेपेक्षा सक्षम होऊन अमेरिकेच्या दादागिरीला वेसण बसली.
युद्धामुळे अमेरिकेची प्रतिमा मलीन; फायदा चीन-रशियाचा
युद्धामुळे अमेरिकेची प्रतिमा मलीन झाली. याचा फायदा चीनच्या 'सॉफ्ट पॉवर'ला होत आहे. इराणने १४ दिवसांचा युद्धविराम स्वीकारला, त्यासाठी चीनचा दबाव होता. चीन आता हळूहळू अशा वादांमध्ये मध्यस्थी करून अमेरिकेची जागा घेत आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील जागतिक व्यवस्था संपुष्टात येत आहे, या चीनच्या दृष्टिकोनाला इराण युद्धामुळे बळ मिळत आहे. रशियासाठी हे युद्ध फायद्याचे ठरले, कारण यामुळे जगाचे लक्ष युक्रेन युद्धावरून विचलित झाले.