इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:56 IST2026-04-09T13:53:38+5:302026-04-09T13:56:19+5:30
Iran-US Islamabad Talks: इराणने अमेरिकेवर शस्त्रसंधीच्या ३ प्रमुख अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे. लेबनानवरील हल्ले आणि ड्रोन घुसखोरीमुळे आता इस्लामाबादमधील चर्चा धोक्यात आली आहे.

इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता चर्चा सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेने शस्त्रसंधीच्या तीन महत्त्वाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप इराणने केला आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर गालिबाफ यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने पुन्हा एकदा विश्वासार्हता गमावली असून आता चर्चा करणे तर्कसंगत उरलेले नाही.
इराणने केलेले ३ मुख्य आरोप
१. लेबनानमधील हल्ले: शस्त्रसंधीची पहिली अट लेबनानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची होती. मात्र, अमेरिकेचा मित्रदेश इस्रायल तिथे सातत्याने हल्ले करत आहे. लेबनानमध्ये रक्तपात सुरू असताना शस्त्रसंधी होऊ शकत नाही, असे इराणने म्हटले आहे.
२. हवाई हद्दीचे उल्लंघन: दुसरी अट इराणच्या हवाई हद्दीचा आदर करण्याची होती. मात्र, इराणच्या 'फार्स' प्रांतातील 'लार' शहरात घुसखोरी करणारा अमेरिकन ड्रोन आढळला, जो इराणने पाडला आहे.
३. युरेनियम संवर्धनाचा अधिकार: तिसऱ्या अटीनुसार, इराणच्या युरेनियम संवर्धनाच्या अधिकाराला मान्यता मिळणार होती. मात्र, आता अमेरिका या अधिकाराला नकार देत असल्याचे गालिबाफ यांनी सांगितले.
चर्चेचा आधारच तुटला
इराणचे उप-परराष्ट्र मंत्री सईद खातिबजादेह यांनीही इस्रायलच्या लेबनानमधील कारवायांचा निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्यांना 'नरसंहार' संबोधले असून, जोपर्यंत लेबनान सुरक्षित नाही, तोपर्यंत शस्त्रसंधीवर स्वाक्षरी करणे अशक्य असल्याचे इराणने ठामपणे सांगितले आहे.
दुसरीकडे, इस्रायलने यावर स्पष्टीकरण दिले आहे की, ते केवळ हिजबुल्लाहच्या तळांना लक्ष्य करत आहेत. या नव्या वादामुळे १० एप्रिलपासून होणारी इस्लामाबाद चर्चा आता अधांतरी आहे.