इराण हादरलं! बंदरामध्ये भीषण गॅस स्फोट; नौदल प्रमुखाच्या मृत्यू झाल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 21:35 IST2026-01-31T21:34:55+5:302026-01-31T21:35:51+5:30
Iran Explosion News : इस्रायलने स्फोटातील सहभाग नाकारला. वाचा इराणमधील ताज्या घडामोडी.

इराण हादरलं! बंदरामध्ये भीषण गॅस स्फोट; नौदल प्रमुखाच्या मृत्यू झाल्याची शक्यता
इराणचे महत्वाचे बंदर असलेल्या अहवाजमध्ये एकामागोमाग एक असे दोन भीषण स्फोट झाले आहेत. यामध्ये इमारत कोसळली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला हा हल्ला अमेरिका किंवा इस्रायलने केल्याचे सांगितले जात होते. यामध्ये इराणच्या नौदलाच्या प्रमुखाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. परंतू, इराणने ही अफवा असल्याचे म्हटले आहे.
बंदर परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बंदर अब्बास येथील स्फोटांच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये तणावाचे वातावरण असून, इस्रायलने या घटनांमध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बचावकार्यात चिमुरड्याला जीवदान
अहवाजमधील स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण इमारत पत्त्यासारखी कोसळली. स्थानिक अग्निशमन दल आणि बचाव पथकाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. ढिगाऱ्याखालून एका लहान मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून, या बचावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इराणच्या दक्षिण भागातील बंदर अब्बास बंदराजवळ झालेल्या एका गूढ स्फोटानंतर इस्रायलवर संशयाची सुई होती. मात्र, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायली अधिकाऱ्यांनी या स्फोटात आपला कोणताही हात नसल्याचे म्हटले आहे.
आयआरजीसी प्रमुखांच्या मृत्यूच्या अफवा
या स्फोटांच्या मालिकेत इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे नौसेना प्रमुख अलीरेझा तंगसिरी यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र, इराणने या बातम्या धादांत खोट्या असल्याचे सांगत स्पष्ट केले की, नौसेना कमांडर पूर्णपणे सुरक्षित आहेत.