"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 13:17 IST2026-04-12T13:15:45+5:302026-04-12T13:17:15+5:30
इराणच्या धमक्यांना प्रत्युत्तर देताना नेतन्याहू म्हणाले, "इराणला आमचा अंत करायचा होता, पण आज परिस्थिती उलट आहे. ते आमचा गळा आवळायला निघाले होते, पण आता आम्हीच त्यांचा गळा आवळत आहोत. ज्यांनी आम्हाला संपवण्याची धमकी दिली, ते आज स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत आहेत."

"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चा फिसकटल्यानंतर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. इराणचे अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम मोडीत काढण्यात इस्रायलची मोहीम यशस्वी ठरली असल्याचे मोठे विधान नेतन्याहू यांनी केले आहे.
नेतन्याहू म्हणाले, "ही मोहीम अद्याप संपलेली नाही. मात्र, आपण ऐतिहासिक यश मिळवले आहे. इराणने गाझातील हमास, लेबनॉनमधील हिजबुल्ला, सीरियातील असद राजवट, इराकमधील मिलिशिया आणि येमेनमधील हूती यांच्या माध्यमाने आम्हाला चहूबाजूंनी घेरून आमचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला होता."
इराणच्या धमक्यांना प्रत्युत्तर देताना नेतन्याहू म्हणाले, "इराणला आमचा अंत करायचा होता, पण आज परिस्थिती उलट आहे. ते आमचा गळा आवळायला निघाले होते, पण आता आम्हीच त्यांचा गळा आवळत आहोत. ज्यांनी आम्हाला संपवण्याची धमकी दिली, ते आज स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत आहेत." हे सर्व २८ फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांपासून सुरू झाले.
अमेरिकेच्या प्रमुख मागण्या -
माध्यमांतील वृत्तानुसार, अमेरिकेने इराणला युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवण्याची मागणी केली आहे. यात देशातील सुमारे ९०० पाउंड युरेनियमचा साठा देशाबाहेर पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. या शिवाय, अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीचे व्यवस्थापन स्वतःच्या अटींवर करायचे आहे. अशा अटींमुळे ही चर्चा फिस्कटल्याचे समजते.
का फिसकटली चर्चा? इराण म्हणाला... -
या चर्चेसंदर्भात माहिती देताना इराणची सरकारी वृत्तवाहिनी IRIB ने टेलिग्रामवर म्हटले आहे, "इराणी लोकांच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी इराणी शिष्टमंडळाने २१ तास सातत्याने आणि जोरदारपणे चर्चा केली. इराणी शिष्टमंडळाने पूर्णपणे प्रयत्न करूनही, अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा पुढे सरकू शकली नाही आणि संपुष्टात आली."