इराणला मिळाली रशियाची साथ, पुतिन यांनी स्पष्ट केली भूमिका; इस्रायल-अमेरिका तणावात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:11 IST2025-06-23T20:10:40+5:302025-06-23T20:11:29+5:30
Iran Russia Relations: अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर रशियाने इराणला पाठिंबा दिला आहे.

इराणला मिळाली रशियाची साथ, पुतिन यांनी स्पष्ट केली भूमिका; इस्रायल-अमेरिका तणावात...
Iran Russia Relations: इस्रायविरोधातील युद्धात अमेरिकेने अचानक हल्ला केल्यामुळे इराण बॅकफूटवर आला आहे. इस्रायलला अमेरिकेकडून थेट मदत मिळतेय, पण इराणला अद्याप रशिया आणि चीनकडून म्हणावी तशी मदत मिळालेली नाही. इराणचे प्रमुख खामेनी यांनी रशियाकडे मदतीचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना रशियाच्या दौऱ्यावर पाठवले असून, आता रशियाने इराणला मदत करण्यास तयारी दर्शवली आहे.
पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रशियन सरकारचे प्रवक्ते पेस्कोव्ह म्हणाले, रशियाने यापूर्वीही इराण-इस्रायल युद्धावर आपली भूमिका उघडपणे जाहीर केली आहे. आम्ही इराणला मदत करायला तयार आहोत, आता फक्त इराणला काय हवे आहे, यावर सर्व काही अवलंबून आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रशियन सैन्यानेही या युद्धात उडी घेतली, तर हे युद्ध आणखी भयानक रुप धारण करू शकते.
पुतिन काय म्हणाले?
मॉस्कोमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांना सांगितले की, इराणवरील आक्रमण चुकीचे आणि निराधार आहे. त्यांनी पुन्हा एकदा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला. दरम्यान, रशियाने या युद्धात उडी घेतली, तर इराणची शक्ती वाढेल. रशियन हवाई संरक्षण मिळाल्यानंतर, इराणमध्ये इस्रायली हल्ल्यांमुळे होणारे नुकसान कमी होईल. मात्र, या युद्धाची भीषणता आणखी वाढू शकते.