Iran: इराणमध्ये क्रूरतेचा कळस! तुरुंगातील निदर्शकांचे कपडे काढून कडाक्याच्या थंडीत सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:17 IST2026-01-21T12:15:17+5:302026-01-21T12:17:38+5:30
Iran Protests: इराणमध्ये सुरू असलेल्या जनक्षोभाला चिरडण्यासाठी तिथल्या सरकारने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. समोर येणारे अहवाल काळजाचा थरकाप उडवणारे आहेत.

Iran: इराणमध्ये क्रूरतेचा कळस! तुरुंगातील निदर्शकांचे कपडे काढून कडाक्याच्या थंडीत सोडले
इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने दडपशाहीचा अवलंब केला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या या निदर्शनांनी आता अत्यंत हिंसक वळण घेतले असून तुरुंगात असलेल्या निदर्शकांवर अमानुष अत्याचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुंगातील निदर्शकांचे कपडे काढून त्यांना कडाक्याच्या थंडीत सोडले जात असल्याची माहिती ब्रिटीश वृत्तपत्र ‘डेली एक्सप्रेस’ आणि इतर आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिली. एकीकडे जागतिक स्तरावर या अत्याचाराचा निषेध होत असताना, इराण सरकार मात्र कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता निदर्शकांचा आवाज कायमचा दाबण्यासाठी बळाचा वापर करत आहे.
तुरुंगात डांबलेल्या निदर्शकांचे मनोधैर्य तोडण्यासाठी इराण सरकार क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडत आहे. अहवालानुसार, कैद्यांचे कपडे काढून त्यांना कडाक्याच्या थंडीत तुरुंगाच्या अंगणात उघडे सोडले जात आहे. इतक्यावरच न थांबता, गोठवणाऱ्या थंडीत त्यांच्या अंगावर पाईपद्वारे थंड पाण्याचा मारा केला जातो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कैद्यांना जबरदस्तीने काही इंजेक्शन्स दिली जात आहेत. ही इंजेक्शन्स कसली आहेत आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात? याची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवून कैद्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. रॉयटर्स आणि इतर संस्थांच्या मते, निदर्शने चिरडण्यासाठी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स तैनात करण्यात आले.
इराणी प्रशासनाच्या निर्दयीपणाचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना या निदर्शनांत गमावले आहे, त्यांच्याकडून प्रशासनाने विचित्र मागणी केली आहे. आपल्या नातेवाईकाला मारण्यासाठी वापरल्या गेलेल्या गोळ्यांचा खर्च प्रशासनाला द्या, तरच मृतदेह ताब्यात मिळेल, असे अमानवीय फर्मान काही ठिकाणी सोडण्यात आल्याचे अहवाल सांगतात.
इराणमधील इंटरनेट ब्लॅकआउटमुळे नेमकी माहिती बाहेर येण्यास अडथळे येत आहेत. मात्र, विविध मानवाधिकार संघटनांनी दिलेली आकडेवारी धडकी भरवणारी आहे. एचआरएएनएनुसार, इराणमध्ये आतापर्यंत पाच हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, २६ हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. इराण इंटरनॅशनलने मृतांचा आकडा १२ हजारांपर्यंत गेला असल्याची भिती व्यक्त केली. तर, सीबीएस न्यूजकडून मृतांचा आकडा २० हजारांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली.