इराणमधील आंदोलनासाठी खामेनीईंनी अमेरिकेला धरले दोषी; तर ट्रम्प यांनी केली नेतृत्वबदलाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 17:38 IST2026-01-18T17:37:18+5:302026-01-18T17:38:41+5:30

डिसेंबर 2025 च्या अखेरीस इराणमध्ये आंदोलनाची सुरुवात झाली.

Iran Protest: Khamenei blames America for protests in Iran; Trump demands leadership change | इराणमधील आंदोलनासाठी खामेनीईंनी अमेरिकेला धरले दोषी; तर ट्रम्प यांनी केली नेतृत्वबदलाची मागणी

इराणमधील आंदोलनासाठी खामेनीईंनी अमेरिकेला धरले दोषी; तर ट्रम्प यांनी केली नेतृत्वबदलाची मागणी

Iran Protest:इराणमध्ये गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेली तीव्र आंदोलने आता काही प्रमाणात शांत होत असतानाच, देशाचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांनी प्रथमच देशवासीयांना संबोधित केले. या भाषणात त्यांनी आंदोलनांसाठी थेट अमेरिका आणि इजरायलला जबाबदार धरले. डिसेंबर 2025 च्या अखेरीस सुरू झालेल्या या राष्ट्रव्यापी आंदोलनांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचे खामेनेई यांनी मान्य केले. काही मृत्यू अमानवी आणि क्रूर असल्याचे कबूल करत, त्यांनी त्यामागे परकीय शक्तींचे षड्यंत्र असल्याचा दावा केला.

खामेनेई यांनी आपल्या भाषणात आंदोलनांची आखणी अमेरिकेने केल्याचा आरोप केला. यासाठी त्यांनी थेट अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना जबाबदार धरले. खामेनेई म्हणाले, ट्रम्प यांनी आंदोलकांना प्रोत्साहन देत लष्करी मदतीचे आश्वासन दिले. इराणला गिळंकृत करण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे. यावेळी खामेनेई यांनी आंदोलकांचे दोन गट असल्याचा दावा केला. एक परकीय शक्तींनी प्रशिक्षित व समर्थित लोक आणि दुसरे त्यांच्या प्रभावाखाली आलेले तरुण.

ट्रम्प यांची प्रत्युत्तरादाखल प्रतिक्रिया

दरम्यान, खामेनेईंच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी Politico ला दिलेल्या मुलाखतीत तीव्र शब्दांत टीका केली. ट्रम्प म्हणाले, इराणला आता नव्या नेतृत्वाची गरज आहे. खामेनेई हे भीती आणि मृत्यूच्या जोरावर देश चालवणारे आजारी व्यक्ती आहेत. नेतृत्व सन्मानाने होते, भीतीने नाही. खराब नेतृत्वामुळे इराण जगातील सर्वात वाईट देश बनला आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला.

आंदोलनांची सुरुवात कशी झाली?

इराणमधील ही अस्थिरता 28 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाली. याची कारणे म्हणजे, इराणी रियालचे झपाट्याने अवमूल्यन, 40% महागाई आणि इंधन व अन्नधान्याच्या वाढत्या किमती. सुरुवातीला आर्थिक स्वरूपाची आंदोलने पुढे राजकीय बंडात रूपांतरित झाली. हुकूमशाह मुर्दाबादसारख्या घोषणा दिल्या गेल्या. आंदोलन 31 प्रांतांमध्ये पसरले, काही ठिकाणी 1979 पूर्व राजेशाहीची चिन्हेही दिसून आली.

1979 नंतरची सर्वात रक्तरंजित अस्थिरता

विश्लेषकांच्या मते, ही घटना 1979 च्या इस्लामी क्रांतीनंतरची इराणमधील सर्वात प्राणघातक अशांतता ठरली आहे. सध्या आंदोलन कमी झाले असले, तरी देशातील राजकीय आणि सामाजिक तणाव कायम आहे.

Web Title : ईरान विरोध: खामenei ने अमेरिका को दोषी ठहराया; ट्रम्प ने नेतृत्व परिवर्तन मांगा।

Web Summary : खामenei ने ईरान में विरोध के लिए अमेरिका, इजरायल को दोषी ठहराया, मौतों को स्वीकार किया। ट्रम्प ने पलटवार करते हुए नए नेतृत्व की मांग की, खामenei के डर-आधारित शासन और ईरान के पतन का हवाला दिया।

Web Title : Iran protests: Khamenei blames US; Trump demands leadership change.

Web Summary : Khamenei blamed US, Israel for Iran protests, acknowledging deaths. Trump retorted, demanding new leadership, citing Khamenei's fear-based rule and Iran's decline.