इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:21 IST2026-04-08T15:19:59+5:302026-04-08T15:21:01+5:30
Iran Oil Refinery Blast: इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात युद्धविराम जाहीर होऊन काही तास उलटत नाहीत तोच, इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नुकत्याच सुरू झालेल्या शांतता प्रक्रियेवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
इराण आणि अमेरिका-इस्रायल दरम्यान ४० दिवसांच्या युद्धानंतर बुधवारी सकाळीच १५ दिवसांचा युद्धविराम लागू झाला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. इराणच्या सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती इराणच्या 'मेहर' न्यूज एजन्सीने दिली आहे. सीझफायर लागू झाल्यानंतर इराणमधील ही पहिलीच मोठी हिंसक घटना आहे.
फारसच्या आखातात असलेल्या ७८ वर्ग किमी क्षेत्राच्या लावन बेटावर इराणचा मोठा कच्चे तेल निर्यात टर्मिनल आणि 'लावन गॅस क्षेत्र' आहे. इथल्या रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात किती नुकसान झाले आणि हा स्फोट तांत्रिक बिघाडामुळे झाला की तो हल्ला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, युद्धविराम जाहीर झाल्यावर काही तासांतच ही घटना घडल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे कुवेतवर ड्रोन हल्ला झाला आहे. कुवेत सरकारने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, हा हल्ला इराणच्या बाजूने करण्यात आल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे नुकतीच सुरू झालेली शांतता चर्चा धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
इराणचा आक्रमक पवित्रा
इराणच्या मेहर न्यूजने या घटनेनंतर म्हटले आहे की, "दोन्ही बाजूंनी युद्धविरामाचे पालन करणे अनिवार्य आहे. जर हा स्फोट एखाद्या आक्रमक कारवाईचा भाग असेल, तर इराण त्याचे जोरदार प्रत्युत्तर देईल." इराणच्या या इशाऱ्यामुळे मिडल ईस्टमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे.
युद्धविरामाची स्थिती
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, हा युद्धविराम केवळ दोन आठवड्यांसाठी असून यादरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, लावन बेटावरील या स्फोटामुळे चर्चेच्या वाटेत पुन्हा अडथळे निर्माण झाले आहेत. आता अमेरिका आणि इस्रायल या घटनेवर काय प्रतिक्रिया देतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.