कारमध्ये पेट्रोल नाही, ताटात जेवण नाही, पाकिस्तानची दयनीय अवस्था; इफ्तार पार्ट्यांवरही बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 10:15 IST2026-03-10T10:14:48+5:302026-03-10T10:15:36+5:30

पाकिस्तानमध्ये इंधनाच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि स्ट्रेट होर्मुझमधील वाहतुकीवर संकट आहे.

Iran Isreal US War: No petrol in the car, no food on the plate, the pathetic condition of Pakistan; Iftar parties also banned | कारमध्ये पेट्रोल नाही, ताटात जेवण नाही, पाकिस्तानची दयनीय अवस्था; इफ्तार पार्ट्यांवरही बंदी

कारमध्ये पेट्रोल नाही, ताटात जेवण नाही, पाकिस्तानची दयनीय अवस्था; इफ्तार पार्ट्यांवरही बंदी

मध्य पूर्वेतील आखाती देशांमधील युद्ध आणि स्ट्रेट होर्मुझमधील वाढत्या तणावामुळे आता शेजारील राष्ट्र पाकिस्तानात जीवन जगणेही कठीण झाले आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किंमतीने १०० डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे पाकिस्तानात इंधन सकट आणखी तीव्र झाले आहे. सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तान सरकारने अनेक कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इंधनाची मागणी कमी करण्यासाठी आणि ऊर्जा संकटाला सामोरे जाण्यासाठी शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यामागे देशातील पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचा हेतू आहे. सरकारी निर्णयानुसार, पाकिस्तानात शाळा २ आठवडे बंद राहतील. कॉलेज, युनिवर्सिटीचे क्लास ऑनलाईन घेतले जातील. ज्यामुळे विद्यार्थी आणि शालेय कर्मचाऱ्यांचा प्रवास कमी होईल. त्याशिवाय ऑफिशियल डिनर, इफ्तार पार्टी यांच्यावरही बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.

जीवनावश्यक वस्तूचे दर वाढले

रमजानच्या काळात पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढली आहे. पंजाब प्रांतात फळे, भाज्या यांचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशावर भार वाढला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर सरकारी नियमानुसार निश्चित केले जातात, परंतु प्रत्यक्ष बाजारात चढ्या दराने माल विक्री होत आहे. केळ्यांची किंमत ३०० रूपये डझन इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे पेरू १४५ रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकला जात होता, परंतु त्याहूनही कमी दर्जाचे फळ १५० रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकले जात आहे. कंधारी डाळिंब, ज्याची अधिकृत किंमत ६३० रुपये प्रति किलोग्रॅम आहे. मात्र ते साधारणपणे ७०० रुपये प्रति किलोग्रॅमला विकले जात आहे.

पेट्रोल आणि डिझेल महाग का झाले?

पाकिस्तानमध्ये इंधनाच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि स्ट्रेट होर्मुझमधील वाहतुकीवर संकट आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे या महत्त्वाच्या सागरी मार्गाने होणाऱ्या तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जगातील कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा या मार्गाने जातो. त्यामुळे तणाव वाढत असताना आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या. पाकिस्तानही आपल्या तेलाच्या गरजेचा मोठा भाग इथूनच आयात करतो. मात्र या मार्गावर उभे राहिलेले संकट यामुळे देशात इंधनाचा पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे सरकारला पेट्रोल, डिझेलचे दर वाढवावे लागत आहेत. 

Web Title: Iran Isreal US War: No petrol in the car, no food on the plate, the pathetic condition of Pakistan; Iftar parties also banned