इराणने शेवटपर्यंत हार मानली नाही, एका फोनमुळे युद्ध थांबले; कोणी केलेला तो फोन..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:38 IST2025-06-24T13:37:53+5:302025-06-24T13:38:19+5:30
Iran-Israel War: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाला आज अखेर ब्रेक लागला. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीस होकार दिल्यामुळे तणाव थांबला.

इराणने शेवटपर्यंत हार मानली नाही, एका फोनमुळे युद्ध थांबले; कोणी केलेला तो फोन..?
Iran-Israel War: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायलयुद्धाला आज अखेर ब्रेक लागला. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्यास होकार दिल्यामुळे हा तणाव थांबला. दरम्यान, यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारच्या शिफारशीवरुन इराण आणि इस्रायलमध्येयुद्धबंदीची मध्यस्थी केली. न्यूजवीक मासिकाने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाला देऊन हा खुलासा केला आहे.
अहवालात म्हटले आहे की, इराणने कतारवर क्षेपणास्त्रे डागताच कतारचे अमीर आणि पंतप्रधानांनी अमेरिकेकडे युद्धविरामासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. न्यूजवीकने अमेरिकन राजदूताचा हवाला देत म्हटले आहे की, कतारच्या शिफारशीवरून ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील त्यांचे राजदूत विटकॉफ यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर विटकॉफ यांनी त्यांच्या इराणी समकक्षांना फोन लावला.
कतारचे अमीर घोषणा होईपर्यंत अॅक्टिव्ह होते
सोमवारी मध्यरात्री इराणने कतारवर क्षेपणास्त्रे डागली आणि येथील अमेरिकन हवाई तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर कतार खडबडून जागा झाला आणि अमेरिकेकडे मदतीचे आवाहन केले. युद्धविरामाची घोषणा होईपर्यंत कतारचे अमीर आणि पंतप्रधान अॅक्टिव्ह होते. दोघेही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्याशी सातत्याने संपर्कात होते.
इराणने ठेवली अट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन राजदूत विटकॉफने इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना फोन करताच परराष्ट्रमंत्र्यांनी एक अट ठेवली. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची म्हणाले की, इस्रायलने हल्ला थांबवला तरच हा प्रश्न सुटू शकेल. इस्रायलने युद्ध सुरू केले, हल्ला थांबवणे हेदेखील त्यांचे काम आहे. जर इस्रायलने हल्ला थांबवला, तर आम्हीही हल्ला करणार नाही. फोनवर विटकॉफने इराणला आश्वासन दिले की पुढील २४ तासांनंतर इस्रायल हल्ला करणार नाही. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवर बोलल्यानंतर, विटकॉफने व्हाईट हाऊसला आपला संदेश पाठवला. त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धविरामाची घोषणा केली.