Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 08:50 IST2025-06-21T08:47:27+5:302025-06-21T08:50:18+5:30
Iran Israel War : इस्त्रायलने इराणवर हल्ले वाढवले आहेत. तर दुसरीकडे इराणने वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे.

Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
Iran Israel War : इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव आणखी वाढला आहे. इराणने अण्वस्त्रांबाबत वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे. यामुळे आता या दोन्ही देशात सुरु असलेले युद्ध पुन्हा वाढू शकते. युरोपीय देशांशी झालेल्या चर्चेत इराणने वाटाघाटी करण्यास नकार दिला. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि युरोपियन युनियन अणुप्रश्नी इराण आणि अमेरिकेत चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शुक्रवारी युद्धाच्या आठव्या दिवशी इस्रायलने पुन्हा एकदा इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी तळांना लक्ष्य केले. इराणने दुसऱ्या दिवशीही प्रत्युत्तर म्हणून बीरशेबा शहराला लक्ष्य केले. बीरशेबा येथील मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या कार्यालयासमोर झालेल्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत.
iran israel news: इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नेमके कधी मायदेशी आणलं जाणार?
शुक्रवारी इराणने पुन्हा हैफावर हल्ला केला, यामध्ये १७ जण जखमी झाले. इराणमध्ये, इस्रायली हल्ल्यांदरम्यान, हजारो लोक शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी घराबाहेर पडले आणि त्यांनी एकत्रितपणे इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध घोषणाबाजी केली.
अमेरिकेने अजूनही निर्णय घेतला नाही
इस्रायली सैन्याने इराणमधील लष्करी तळ, क्षेपणास्त्र निर्मिती कारखाने, संशोधन संस्था आणि अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी, मध्य तेहरानमधील एका निवासी इमारतीलाही इस्रायलने लक्ष्य केल्याचे वृत्त आहे. तर व्हाईट हाऊसने म्हटले आहे की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
दोन आठवड्यांनंतर परिस्थितीचे मूल्यांकन करून ते अंतिम निर्णय घेतील. दरम्यान, अमेरिका इराणशी चर्चेची शक्यता आहे.
अमेरिकेच्या या भूमिकेनंतर, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, त्यांचे सैन्य इराणशी एकट्याने सामना करण्यास सक्षम आहे. तर जिनेव्हा येथे पोहोचलेले इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची म्हणाले, इस्रायली हल्ल्यांदरम्यान त्यांचा देश अमेरिकेशी बोलण्यास इच्छुक नाही.
जर अणुप्रश्नी चर्चा पुन्हा सुरू करायची असेल, तर इस्रायली हल्ले थांबवावे लागतील. इराणने प्रमुख युरोपीय देशांच्या समकक्षांशी झालेल्या चर्चेत हे म्हटले आहे.