ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 10:44 IST2025-06-24T10:43:58+5:302025-06-24T10:44:15+5:30
Iran Israel Ceasefire latest Attack: इराणने कतारमधील अमेरिकेच्या मोठ्या एअरबेसवर हल्ला चढविला. यानंतर लगेचच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायल-इराणमध्ये सीझफायर केल्याची घोषणा केली.

ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
इराणवर अमेरिकेने तीन दिवसांपूर्वी हल्ला चढविला होता. यामुळे भडकलेल्या इराणने अमेरिकेला धडा शिकविण्याची धमकी दिली होती. यानुसार आज मध्यरात्री इराणने कतारमधील अमेरिकेच्या मोठ्या एअरबेसवर हल्ला चढविला. यानंतर लगेचच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायल-इराणमध्ये सीझफायर केल्याची घोषणा केली. परंतू, ती आता त्यांच्याच अंगलट आली आहे. इराणने ट्रम्प यांच्या घोषणेनंतर लगेचच इस्रायलवर जोरदार मिसाईल हल्ला चढविला आहे. यात तीन इस्रायली नागरिक मारले गेले आहेत.
इराणनुसार इस्रायलने आपल्यावर पहिले हल्ले केले आहेत. आपण कोणताही हल्ला केला नव्हता, तसेच कोणाला उकसवले देखील नव्हते. यानंतर अमेरिकेनेही आपला विश्वासघात केल्याचे आरोप इराणने केले होते. आता इस्रायलला नडणारा देश अखेर भेटला आहे. यामुळे अमेरिकेने आपले नुकसान होऊ नये या उद्देशाने एकाबाजुनेच सीझफायर केल्याची घाईघाईने घोषणा केली आहे. परंतू, इराण काही थांबताना दिसत नाहीय.
अमेरिका, इस्रायलला वाटेल तेव्हा हल्ले आणि वाटेल तेव्हा सीझफायर हा प्रकार चालणार नाही, हेच इराणने ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही इस्रायलवर हल्ला करून एकप्रकारे दाखवून दिले आहे. इराणने केलेल्या ताज्या हल्ल्यात येरुशलेम आणि तेल अवीवमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. तसेच इराणच्या मिसाईलने बीरशेबा इमारतीवरही हल्ले केले आहेत. यात कमीतकमी तीन इस्रायली नागरिक मारले गेले आहेत, तर अनेक जखमी आहेत.
इस्रायली सैन्याने आपल्या जनतेला इशारा दिला की इराणने त्यांच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली आहेत, तर प्रस्तावित युद्धबंदी अद्यापही अनिश्चित आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ वाजता ही मिसाईल डागण्यात आली आहेत. सहा बॅलेस्टिक मिसाईल डागण्यात आली आहेत.
ट्रम्प यांना कशाची घाई...
नोबेलवर दावा सांगणाऱ्या ट्रम्प यांनी दुसऱ्याच दिवशी इराणवर हल्ले चढविले होते, यामुळे जगभरात त्यांची नाचक्की झाली होती. त्यातच इराणने आपला मोर्चा कतारमधील अमेरिकी एअरबेसवर वळविल्याने आता अमेरिकेचे नुकसान होणार हे पाहून ट्रम्पनी भारत-पाकिस्तान युद्धासारखीच शेखी मिरविली आहे. इस्रायल आणि इराण एकाच वेळी माझ्याकडे आले आणि शांतता प्रस्थापित करूया असे म्हणाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.