लहान मुले युद्धाच्या विळख्यात; आतापर्यंत १,१०० हून अधिक मुलांचा मृत्यू किंवा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:45 IST2026-03-12T17:44:52+5:302026-03-12T17:45:48+5:30
Iran Israel US War Children Casualties: संयुक्त राष्ट्रांची बालसंस्था UNICEF ने आपला अहवाल जारी केला आहे.

लहान मुले युद्धाच्या विळख्यात; आतापर्यंत १,१०० हून अधिक मुलांचा मृत्यू किंवा जखमी
Iran Israel US War Children Casualties: मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या संघर्षाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत असल्याचा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्रांची बालसंस्था UNICEF ने दिला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशातील लाखो मुलांचे जीवन धोक्यात आले आहे.
हजाराहून अधिक मुलांचे मृत्यू किंवा जखमी
युनिसेफच्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १,१०० हून अधिक मुले मृत किंवा जखमी झाली आहेत. यात, इराणमध्ये सुमारे २०० मुलांचा मृत्यू झाला आहे, तर लेबनॉनमध्ये ९१ इस्रायलमध्ये ४ आणि कुवैतमध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. संस्थेच्या मते, वाढत्या हिंसाचारामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
लाखो मुले शिक्षणापासून वंचित
सततच्या बॉम्बहल्ल्यांमुळे आणि संघर्षामुळे लाखो कुटुंबांना आपली घरे सोडावी लागली आहेत. परिणामी शेकडो हजार मुले बेघर झाली आहेत. या संकटामुळे अनेक शाळा बंद पडल्या असून लाखो मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. युनिसेफने स्पष्ट केले की, मुलांची हत्या किंवा त्यांना जखमी करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही. तसेच मुलांसाठी आवश्यक असलेल्या आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सेवांवर होणारे हल्लेही अत्यंत चिंताजनक आहेत. संस्थेच्या अंदाजानुसार संपूर्ण पश्चिम आशिया प्रदेशात सुमारे २० कोटी मुले राहतात आणि या संकटातून त्यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
इराणकडून शांततेचा प्रस्ताव
दरम्यान, इराणच्या राष्ट्राध्यक्ष मसुद पेजेश्कियान शांततेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तेहरान सरकार शांततेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगताना त्यांनी युद्ध समाप्त करण्यासाठी काही अटी मांडल्या आहेत. पेजेश्कियान यांच्या मते, हा संघर्ष इस्रायली शासन आणि अमेरिकेमुळे सुरू झाला असून युद्ध संपवण्यासाठी इराणच्या अधिकारांची मान्यता आवश्यक आहे.
रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी चर्चा
इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलेल्या माहितीनुसार त्यांनी रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी इराणची बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. युद्ध संपवण्यासाठी इराणच्या कायदेशीर अधिकारांची मान्यता, झालेल्या नुकसानीची भरपाई आणि भविष्यात हल्ले होऊ नयेत यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस हमी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.