"इस्रायली सेनेने गाझामध्ये पाऊल जरी ठेवले तरी..."; इराणचा मुख्य कमांडर हुसेन सलामी धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 05:18 PM2023-10-27T17:18:07+5:302023-10-27T17:20:21+5:30

इस्रायल-हमास युद्धामध्ये आता इराणदेखील सक्रीय सहभाग नोंदवताना दिसतेय

Iran irgc chief commander Hossain salami warning Israel not to engage in ground operation in Gaza | "इस्रायली सेनेने गाझामध्ये पाऊल जरी ठेवले तरी..."; इराणचा मुख्य कमांडर हुसेन सलामी धमकी

"इस्रायली सेनेने गाझामध्ये पाऊल जरी ठेवले तरी..."; इराणचा मुख्य कमांडर हुसेन सलामी धमकी

Israel Hamas War, Iran Warning: इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे मुख्य कमांडर मेजर जनरल हुसेन सलामी यांनी इस्रायलला धमकी दिली आहे. जर जमिनीवर युद्ध झाले तर इस्रायली सैन्याचा दारुण पराभव होईल, असे सलामीने म्हटले आहे. इस्रायली सैन्याला गाझा ड्रॅगन खाऊन टाकेल. इस्रायलींनी गाझामध्ये पाऊल ठेवले तर त्यांना तिथेच पुरले जाईल. गाझा ही अशी जादुची काठी आहे, शत्रुला लगेच गिळंकृत करेल. अशा स्थितीत इस्रायलने गाझामध्ये जमिनीवर लढा द्यायचा विचार करू नका.

मेजर जनरल हुसेन सलामी यांनी म्हटले आहे की, गाझामध्ये जे काही घडत आहे ते मानवतेविरुद्ध गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. सलामी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला, विशेषत: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे. जगाने गाझाकडे बघून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे ते म्हणाले.

इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही इस्रायलला इशारा दिला

गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर इराणकडून सातत्याने वक्तव्ये येत आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लायान यांनी म्हटले आहे की, गाझामध्ये सुरू असलेली लढाई थांबवली नाही तर ती पॅलेस्टाईनच्या बाहेरही पसरेल. अमेरिकेवर निशाणा साधत इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या युद्धाला प्रोत्साहन दिले जात असल्याचे सांगितले. पॅलेस्टाईनमध्ये असेच हल्ले होत राहिले तर तेही त्यातून सुटू शकणार नाही, हे अमेरिकेनेही समजून घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.

अमेरिका आणि इस्रायलने गाझामधील नरसंहार ताबडतोब थांबवला नाही तर संपूर्ण प्रदेश नियंत्रणाबाहेर जाईल, असे अमीर अब्दुल्लायान यांनी यापूर्वी म्हटले होते. ज्याचे परिणाम दूरगामी आणि अत्यंत वाईट असतील. त्याचबरोबर गाझाला मदत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही इराण मुस्लिम देशांना करत आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करून 1400 लोकांना ठार केले होते. या हल्ल्यानंतर इस्रायलकडून गाझावर सातत्याने बॉम्बफेक करण्यात येत आहे. यापेक्षाही मोठे संकट गाझामध्ये निर्माण झाले आहे. इराणसह अनेक देश यावर सातत्याने चिंता व्यक्त करत आहेत आणि हल्ले थांबवण्याचे आवाहन करत आहेत.

Web Title: Iran irgc chief commander Hossain salami warning Israel not to engage in ground operation in Gaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.