इराणमध्ये ४८ तासांत तिसऱ्या बड्या नेत्याचा खात्मा; गुप्तचर मंत्री इस्माईल खातीब ठार झाल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:50 IST2026-03-18T17:47:08+5:302026-03-18T17:50:12+5:30
इस्रायलने इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खातीब यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे.

इराणमध्ये ४८ तासांत तिसऱ्या बड्या नेत्याचा खात्मा; गुप्तचर मंत्री इस्माईल खातीब ठार झाल्याचा दावा
Esmaeil Khatib: मध्यपूर्वेतील युद्धात इस्रायलनेइराणच्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम उघडली आहे. इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी आणि बासिज कमांडर गुलामरेझा सुलेमानी यांच्या हत्येनंतर, आता इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खातीब यांचाही खात्मा केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. गेल्या ४८ तासांतील ही तिसरी मोठी हाय-प्रोफाईल हत्या असल्याचे मानले जात आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी पुष्टी केली की, तेहरानमध्ये करण्यात आलेल्या एका अचूक हल्ल्यात खातीब यांचा मृत्यू झाला आहे. "इराणमधील कोणत्याही नेत्याला आता अभय नाही, प्रत्येक जण आमचे लक्ष्य आहे," असे कात्झ यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लष्कराला आता इराणच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला पूर्वपरवानगीशिवाय संपवण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत.
कोण होते इस्माईल खातीब?
इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, खातीब हे इराणच्या क्रूर दडपशाहीचे मुख्य सूत्रधार होते. इराणमधील अलिकडच्या काळातील निदर्शने, विशेषतः महसा अमिनी (२०२२-२०२३) आंदोलनादरम्यान आंदोलकांना अटक करणे आणि त्यांच्या हत्येमध्ये खातीब यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जगभरातील इस्रायली आणि अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी कारवायांचे नेतृत्व त्यांनी केले होते. इराणचे गुप्तचर मंत्रालय हे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून जगभर पाळत ठेवणे, हेरगिरी आणि गुप्त मोहिमा राबवण्यासाठी ओळखले जाते, ज्याचे प्रमुख खातीब होते.
इराणच्या गोटात खळबळ
इराणने अद्याप खातीब यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केलेली नाही. मात्र, परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी म्हटले आहे की, "आमची व्यवस्था कोणत्याही एका व्यक्तीवर अवलंबून नाही." दुसरीकडे, इस्रायलने इशारा दिला आहे की आजच्या दिवसात अजून काही मोठे धक्के पाहायला मिळू शकतात.