सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:34 IST2026-04-07T13:33:23+5:302026-04-07T13:34:19+5:30

Iran Human Chain Power Plants War: इस्रायलने इराणी नागरिकांना रेल्वे प्रवासापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे, तर ट्रम्प यांच्या डेडलाईनपूर्वी इराणने आपल्या वीज प्रकल्पांच्या संरक्षणासाठी मानवी साखळी उभारण्यास सुरुवात केली आहे.

Iran Human Chain Power Plants War: All citizens should blockade energy projects...! Iran's new move on Trump's threat, negotiations at a delicate juncture... | सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...

सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...

अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये सध्या अत्यंत भीतीचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली मुदत संपत असतानाच, इस्रायलने इराणी नागरिकांसाठी एक भयानक इशारा दिला आहे, ज्यामुळे इराणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

इस्रायली संरक्षण दलाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून इराणी नागरिकांना रेल्वे आणि रेल्वे मार्गांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. "तुमच्या सुरक्षेसाठी, आम्ही तुम्हाला आवाहन करतो की आज रात्री ९ वाजेपर्यंत (इराणी वेळेनुसार) संपूर्ण इराणमध्ये ट्रेनचा वापर करणे टाळावे. रेल्वे आणि रुळांच्या जवळ तुमची उपस्थिती तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते," असे इस्रायलने स्पष्ट केले आहे. या इशाऱ्यामुळे इस्रायल इराणच्या वाहतूक यंत्रणेवर मोठा हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराणची 'मानवी साखळी'
ट्रम्प यांच्या संभाव्य हल्ल्याच्या धमकीला तोंड देण्यासाठी इराण सरकारने एक अनोखी युक्ती लढवली आहे. इराणच्या 'सुप्रीम काउंसिल ऑफ यूथ'ने देशातील तरुण, खेळाडू, कलाकार आणि विद्यार्थ्यांना दुपारी २ वाजता देशातील प्रमुख 'पावर प्लांट' (वीज प्रकल्प) आणि ऊर्जा केंद्रांच्या भोवती जमा होण्याचे आवाहन केले आहे. ही राष्ट्रीय संपत्ती वाचवण्यासाठी नागरिकांनी तिथे 'मानवी ढाल' म्हणून उभे राहावे, असे सरकारने म्हटले आहे.

ट्रम्प यांची डेडलाईन आणि जगाची धाकधूक
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी मंगळवार रात्रीपर्यंतची वेळ दिली आहे. जर ही अट मान्य झाली नाही, तर इराणच्या पायाभूत सुविधांवर भीषण बॉम्बफेक करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ही वेळ जवळ येत असतानाच इस्रायल आणि इराणच्या या हालचालींनी मिडल ईस्टमध्ये युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे दिसत आहेत.

'वाटाघाटी नाजूक वळणावर', इराणच्या राजदूतांचे मोठे विधान

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच, कूटनीतिक पातळीवर युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानमधील इराणचे राजदूत रझा अमिरी मोगद्दम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे युद्ध रोखण्यासाठी सुरू असलेल्या चर्चा आता अत्यंत 'नाजूक आणि महत्त्वाच्या' टप्प्यावर पोहोचल्या आहेत. त्यांनी पाकिस्तानच्या शांतता प्रयत्नांचे कौतुक केले असून हे प्रयत्न प्रभावी ठरत असल्याचे म्हटले आहे.

तणावाचे मुख्य कारण
इराणने अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या लष्करी तळांवर केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव कमालीचा वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला दिलेली डेडलाईन संपत असतानाच, या कूटनीतिक चर्चा यशस्वी होणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जर ही चर्चा फिस्कटली, तर संपूर्ण आखाती प्रदेशात महायुद्धाचा भडका उडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Iran Human Chain Power Plants War: All citizens should blockade energy projects...! Iran's new move on Trump's threat, negotiations at a delicate juncture...