खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 22:15 IST2026-04-10T22:13:11+5:302026-04-10T22:15:53+5:30
Iran Israel America News: इस्रायल-अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अयातुल्लाह अली खामेनेई यांची हत्या केली. त्यानंतर तब्बल चाळीस दिवस युद्ध सुरू होते. पण, इराण खामेनेईंच्या हत्येनंतर अधिक धोकायदायक बनला असल्याचा रिपोर्ट समोर आलाय.

खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
पश्चिम आशियातील संघर्ष निवळताना दिसत असला, तरी आयडीएफ अर्थात इस्रायल संरक्षण दलाच्या एका रिपोर्टने अमेरिका आणि इस्रायलचे टेन्शन वाढवले आहे. ४० दिवस चाललेल्या या युद्धानंतर आयडीएफने इस्रायलच्या संसदेला म्हणजे नेसेटला माहिती दिली की, इराणमध्ये जे नव्या नेतृत्वाखाली राजवट अस्तित्वात आली आहे, ती पूर्वीच्या तुलनेत खुपच जास्त कट्टर विचारधारेची आहे. अयातुल्लाह अली खामेनेई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संपवल्यानंतर परिस्थिती चांगली होईल अशी अपेक्षा होती, पण त्याच्या उलट गोष्टी घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
'द टाइम्स ऑफ इस्रायल'ने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, आयडीएफच्या प्रतिनिधींनी नेसेटच्या म्हणजे संसदेच्या परराष्ट्र धोरण आणि संरक्षण समितीला एका बंद खोलीत सर्व रिपोर्ट दिला. त्यात इराणमधील मोजतबा खामेनेई यांच्या नेतृत्वाखालील राजवटीबद्दल माहिती दिली गेली आहे.
इराणचे सध्याचे नेते इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित आहेत. ते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्यापेक्षा जास्त कट्टर विचारांचे आहेत, असे रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे.
अमेरिका, इस्रायलची चिंता वाढली
आयडीएफने जी माहिती संसदेच्या दोन महत्त्वाच्या समित्यांसमोर ठेवली आहे. त्या माहितीमुळे अमेरिका आणि इस्रायलच्या चिंतेत भर पडली आहे. कारण अयातुल्लाह अली खामेनेई यांना संपवल्याने इराणचा धोका टळल्याची इस्रायल सरकारची भावना होती, या रिपोर्टमुळे त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
इस्रायली हवाई दलाने संपूर्ण युद्ध मोहिमेच्या काळात १,००० पेक्षा जास्त हवाई हल्ले केले आणि ८,५०० पेक्षा जास्त लक्ष्य साध्य केले. ४ हजार ठिकाणांवर हल्ले करण्यत आले. या युद्धात अमेरिकेलाही मोठे नुकसान सोसावे लागले आहे. विशेषतः त्यांचे दोन वैमानिक मरता मरता वाचले. ४० दिवसांच्या संघर्षानंतर ही माहिती समोर आल्याने वेगळी कलाटणी मिळण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
शांतता चर्चेआधीच समोर आली माहिती
अमेरिका आणि इराण यांच्या शिष्टमंडळांची पाकिस्तानमध्ये चर्चा होणार आहे. दोन्ही देशाचे प्रतिनिधी पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर शनिवारपासून चर्चेला सुरूवात होण्याची आशा आहे. त्याआधीच ही माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हा मुद्दा उपस्थित केला जाणार का? याकडेही लक्ष असेल.