दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:57 IST2026-04-07T13:56:09+5:302026-04-07T13:57:43+5:30
US Rescue Operation Iran Donald Trump PC: इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन वैमानिकांना वाचवण्यासाठी १५५ विमानांनी शत्रूला चकवा दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या ऐतिहासिक मोहिमेचे गुपित उघड केले आहे. वाचा सविस्तर बातमी.

दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
"अमेरिकेचे सैन्य इराणला एका रात्रीत पूर्णपणे संपवू शकते आणि गरज पडल्यास ती रात्र उद्याचीच असू शकते," अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट युद्धाचा इशारा दिला आहे. सोमवारी रात्री पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या युद्धनीतीवर भाष्य करतानाच, अमेरिकेच्या एका धाडसी रेस्क्यू ऑपरेशनचा खुलासाही केला.
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
ट्रम्प यांनी सांगितले की, इराणमध्ये अडकलेल्या दुसऱ्या अमेरिकन पायलटची माहिती शत्रू देशाला नव्हती. मात्र, अमेरिकेतीलच कोणातरी व्यक्तीने ही बातमी मीडियामध्ये लीक केली, ज्यामुळे बचाव मोहीम अत्यंत धोकादायक बनली. ज्या व्यक्तीने ही माहिती लीक केली आहे, त्याचा शोध घेतला जाईल आणि गरज पडल्यास संबंधित मीडिया कंपनीवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
१५५ विमानांचे ऐतिहासिक रेस्क्यू ऑपरेशन
इराणमध्ये अडकलेल्या आपल्या शूर सैनिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने तब्बल १५५ विमानांचा वापर करून एक ऐतिहासिक मोहीम राबवली. यामध्ये ६४ फायटर जेट्स, ४ बॉम्बर आणि १३ रेस्क्यू विमानांचा समावेश होता. "आम्ही शत्रूला फसविण्यासाठी सात वेगवेगळ्या ठिकाणी खोटे सर्च ऑपरेशन चालवले, जेणेकरून इराणचे सैन्य गोंधळून जाईल," असे ट्रम्प यांनी नमूद केले. अमेरिकन विमाने इराणच्या आकाशात अनेक तास घिरट्या घालत होती. या मोहिमेत अमेरिकेचे F-15 विमान पडल्याची कबुलीही त्यांनी दिली, मात्र तो इराणचा केवळ एक 'लकी हिट' होता, असेही ते म्हणाले.
उद्या रात्री १२ वाजेपर्यंतची 'डेडलाईन'
ट्रम्प यांनी इराणला शेवटचा इशारा देताना म्हटले आहे की, "आमच्या नियोजनानुसार, उद्या रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे ५:३०) इराणचा प्रत्येक पूल तोडला जाईल आणि प्रत्येक पॉवर प्लांट जाळून खाक केला जाईल. इराणमध्ये आतापर्यंत आम्ही १३,००० हून अधिक ठिकाणांवर हल्ले केले असून हे नुकसान आणखी वाढणार आहे."
१०० जणांचा जीव लावला पणाला
ट्रम्प यांच्या मते, हा निर्णय अत्यंत जोखमीचा होता. केवळ १-२ वैमानिकांना वाचवण्यासाठी जवळपास १०० इतर सैनिकांचा जीव पणाला लावण्यात आला होता. "गेल्या काही दशकांतील हे सर्वात धाडसी ऑपरेशन होते," असेही त्यांनी नमूद केले. दिवसाउजेडात इराणच्या डोळ्यांत धूळ फेकून अमेरिकेने ही कामगिरी केल्याने ट्रम्प यांनी लष्कराचे कौतुक केले आहे. ही मोहीम दोन टप्प्यांत पार पडली. पहिल्या मोहिमेत २१ विमानांचा समावेश होता, तर दुसऱ्या मोहिमेत ताकदीचा मोठा वापर करण्यात आला.