इराणने खामेनेईंच्या दफनविधीचा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला, कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 12:31 IST2026-03-05T12:30:58+5:302026-03-05T12:31:32+5:30
Iran Crisis : इस्रायल-अमेरिका हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव वाढला!

इराणने खामेनेईंच्या दफनविधीचा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला, कारण काय..?
Iran Crisis : इस्रायल-अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्लाह अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांच्या मृत्यूनंतर मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलकडून सातत्याने हल्ले सुरू असल्यामुळे, इराण सरकारने खामेनेई यांच्या दफनविधी आणि शोकसभेचा कार्यक्रम अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिकृत कारण काय सांगितले?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणच्या एका अधिकाऱ्याने सरकारी मीडियाशी बोलताना सांगितले की, खामेनेई यांच्या शोकसभेचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर अंत्यसंस्काराची नवीन तारीख जाहीर केली जाईल. तेहरानमधील ग्रँड मोसाला मशिदीत खामेनेई यांच्या पार्थिवासाठी व्यवस्था केली जात आहे. हेच ठिकाण इराणमधील मोठ्या धार्मिक आणि राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी ओळखले जाते. सामान्यतः इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या अंत्यसंस्काराला लाखो लोक उपस्थित राहतात, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात व्यवस्था करावी लागते.
सुरक्षा कारणांमुळे कार्यक्रम पुढे ढकलला?
राजकीय विश्लेषकांच्या मते, अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यामागे सुरक्षेचा मोठा धोका असू शकतो. जर लाखो लोक एका ठिकाणी जमा झाले, तर संभाव्य हल्ल्याचा धोका वाढू शकतो. याशिवाय, इराण आधी नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा करून सत्ता संक्रमण स्थिर करायचा प्रयत्न करत असावा, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी इस्रायल आणि अमेरिकेविरोधात घोषणाबाजी करत बदला घेण्याची मागणी केली. मात्र, सरकारकडून अद्याप कोणत्याही मोठ्या लष्करी कारवाईची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
इस्रायलचा कडक इशारा
दरम्यान, इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांच्या वक्तव्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, इराणचा जो कोणी नवीन नेता इस्रायलविरोधी आक्रमक धोरण स्वीकारेल, तो इस्रायलच्या निशाण्यावर असेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, इराणचा कोणताही नेता जर इस्रायल, अमेरिका किंवा इतर देशांना धमकावण्याचा प्रयत्न करेल, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. तसेच, इस्रायली लष्कराला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
खामेनेईंच्या मृत्यूनंतर बदलते राजकीय समीकरण
इराणच्या राजकारणात अनेक दशकांपासून केंद्रस्थानी असलेले खामेनेई हे देशाचे सर्वात शक्तिशाली धार्मिक आणि राजकीय नेते होते. त्यांच्या मृत्यूनंतर आता लवकरच इराणमध्ये नव्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील सत्तासमीकरणात मोठे बदल होऊ शकतात. जगभरातील अनेक देशांचे लक्ष आता तेहरानकडे लागले आहे. पुढचा सर्वोच्च नेता कोण असेल? तो कोणते परराष्ट्र आणि सुरक्षा धोरण स्वीकारेल? हे प्रश्न अनेक देशांना पडले आहेत.