इराण एकटा पडला? अमेरिका-इस्रायलला युरोपची साथ, मध्यपूर्वेत महायुद्धाची चाहूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:53 IST2026-03-02T12:51:46+5:302026-03-02T12:53:09+5:30
Iran Conflict: इराणचे काही खरे नाही; अमेरिका-इस्रायलला मिळाली जर्मनी-ब्रिटेन-फ्रान्सची साथ

इराण एकटा पडला? अमेरिका-इस्रायलला युरोपची साथ, मध्यपूर्वेत महायुद्धाची चाहूल
Iran Conflict: अमेरिका-इस्रायलनेइराणवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर मध्य-पूर्वेतील तणाव टोकाला पोहोचला आहे. प्रत्युत्तरात इराणने अनेक गल्फ देशांवर केलेल्या हल्ल्यामुळे युद्धाचा विस्तार होण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. अशातच, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन या तीन प्रमुख युरोपियन देशांनी इराणकडून झालेल्या मिसाइल व ड्रोन हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
इराणला इशारा...
संयुक्त निवेदनात फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन यांनी स्पष्ट केले की, इराणने अशा देशांवरही हल्ले केले, जे थेट अमेरिका-इस्रायल कारवाईत सहभागी नव्हते. यामुळे युरोपियन देशांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण झाला आहे. इराणची मिसाइल आणि ड्रोन क्षमता मूळापासून नष्ट करण्यासाठी योग्य पावले उचलली जाऊ शकतात, असा स्पष्ट इशाराही या देशांकडून देण्यात आला आहे.
गल्फ देशांवर इराणचे हल्ले; संपूर्ण क्षेत्र हादरले
अमेरिका आणि इस्रायलने 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' अंतर्गत इराणवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केल्यानंतर परिस्थिती चिघळली. या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार झाले. या घटनेनंतर इराणने प्रतिशोध म्हणून गल्फ देशांवर मोठ्या प्रमाणावर मिसाइल आणि ड्रोन हल्ले केले. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रियाध (सौदी अरेबिया), दुबई, अबू धाबी (UAE), दोहा (कतार), मनामा (बहरीन), जेरुसलेम आणि तेल अवीव (इज्रायल) वर हल्ले केले.
खामेनेईंच्या मृत्यूवर इराणची तीव्र प्रतिक्रिया
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी खामेनेई यांच्या मृत्यूच्या दाव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ही हत्या म्हणजे इस्लामविरोधी आणि विशेषतः शिया समुदायाविरोधातील उघड युद्धघोषणा आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीही देशाच्या संरक्षणासाठी कोणतेही पाऊल उचलण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असे म्हटले आहे.