'भारताने चिनाब-झेलमवर विकासकामे केली, तर...', सिंधू कराराबाबत पाकने पुन्हा गरळ ओकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 19:59 IST2026-01-09T19:58:15+5:302026-01-09T19:59:02+5:30
Indus Water Treaty: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताने सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला.

'भारताने चिनाब-झेलमवर विकासकामे केली, तर...', सिंधू कराराबाबत पाकने पुन्हा गरळ ओकली
Indus Water Treaty: पाकिस्तानने सिंधू कराराबाबत पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबीने गुरुवारी (8 जानेवारी) म्हटले की, सिंधू कराराचे उल्लंघन करून भारताने नद्यांवर कोणतीही विकासकामे केली, तर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलला जाईल. तसेच, त्याने दावा केला की, हा आजही बंधनकारक असलेला आंतरराष्ट्रीय करार आहे आणि तो करार स्थगित करण्याची कोणतीही तरतूद त्यात नाही.
चिनाब-झेलम-नीलम नद्यांवरील प्रकल्पांवर आक्षेप
अंद्राबीने पुढे म्हटले की, चिनाब, झेलम आणि नीलम नद्यांवरील कोणताही प्रकल्प करारांतर्गत तपासणीच्या कक्षेत येतो. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सिंधू जल आयुक्तांनी चिनाब नदीवरील काही भारतीय प्रकल्पांबाबत पत्रव्यवहार केल्याचेही त्यांनी नमूद केले. झेलम आणि नीलम नद्यांवर कोणतेही विकासकाम झाल्यास, ती बाब आम्ही सिंधू आयुक्तांच्या स्तरावर भारतासमोर मांडू. आवश्यक असल्यास ती राजकीय/राजनैतिक स्तरावर तसेच संबंधित आंतरराष्ट्रीय मंचांवरही नेऊ, असेही अंद्राबीने स्पष्ट केले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताची भूमिका
मागील वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताने पाकिस्तानविरोधात काही दंडात्मक पावले उचलली होती. त्यात 1960 चा सिंधू करार स्थगित करण्यात आला होता.