सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:04 IST2025-06-06T13:04:10+5:302025-06-06T13:04:46+5:30
Indus Water Treaty: पाण्याच्या एक-एक थेंबासाठी व्याकुळ झालेल्या पाकिस्तानने अमेरिकेला मध्यस्थी करण्याचे आवाहन केले आहे.

सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
Indus Water Treaty: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला. या निर्णयामुळे तिळपापड झालेला पाकिस्तान सतत भारताला पोकळ धमक्या देतोय. दरम्यान, माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयावर पुन्हा एकदा अणुयुद्धाची धमकी दिली आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनच्या वृत्तानुसार, बिलावल भुट्टो झरदारी सध्या अमेरिकेत आहेत. गुरुवारी (५ जून २०२५) त्यांनी वॉशिंग्टनमधील एका कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकली. ते म्हणतात की, सिंधू पाणी कराराचे उल्लंघन करुन भारत पाकिस्तानच्या जलसंपत्तीचा नाश करत आहे. यामुळे पहिल्या अणुयुद्धाचा पाया रचला जात आहे. आम्ही यापूर्वीच जाहीर केले आहे की, आमचे पाणी रोखणे हे युद्धाचे आव्हान असेल. आम्ही हे मौजमजेसाठी बोलत नाही आहोत, तर हा आमच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे.
बिलावल पुढे म्हणाले की, भारताने सिंधू पाणी कराराचे पालन करावे आणि अमेरिकेसह इतर देशांना या कराराचे उल्लंघन करण्यापासून रोखण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी. जर शांततेसाठी भारताला पाकिस्तानशी सकारात्मक चर्चा करायची असेल, नवीन करार करायचे असतील, तर आधी जुन्या करारांचे पालन करावे लागेल आणि सिंधू पाणी कराराबाबतचा आपला निर्णय मागे घ्यावा लागेल. यावेळी त्यांनी अमेरिकेला मध्यस्थीचे आवाहन केले.