इंडोनेशिया हादरलं! ७.४ रिश्टर स्केलचा भीषण भूकंप आणि त्सुनामीचा तडाखा; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 08:53 IST2026-04-02T08:52:30+5:302026-04-02T08:53:34+5:30

इंडोनेशियामध्ये ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून फिलीपिन्स, मलेशियामध्येही सतर्कता.

Indonesia shaken! A massive earthquake measuring 7.4 on the Richter scale and a tsunami hit; one person died | इंडोनेशिया हादरलं! ७.४ रिश्टर स्केलचा भीषण भूकंप आणि त्सुनामीचा तडाखा; एकाचा मृत्यू

इंडोनेशिया हादरलं! ७.४ रिश्टर स्केलचा भीषण भूकंप आणि त्सुनामीचा तडाखा; एकाचा मृत्यू

इंडोनेशियामध्ये आज पहाटे निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. उत्तर मोलुक्का समुद्रात ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला असून, त्याचे धक्के इतके जोरात होते की झोपेत असलेले नागरिक जीवाच्या आकांताने घराबाहेर पळाले. या भूकंपानंतर समुद्रात सुनामीच्या लाटा उसळल्या असून, या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रशासनाने किनारी भागात हाय अलर्ट जारी केला असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

पहाटेचा तो थरार

२ मार्च रोजी सकाळी जेव्हा लोक गाढ झोपेत होते, तेव्हा अचानक जमीन हलू लागली. संयुक्त राज्य भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, भूकंपाची तीव्रता सुरुवातीला ७.८ मोजली गेली होती, जी नंतर ७.४ वर स्थिर झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू टेरनाटे शहरापासून १२० किमी अंतरावर आणि जमिनीखाली १० किमी खोलीवर होता. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की उत्तर सुलावेसी प्रांतातील बिटुंग शहरात लोक घराबाहेर पळून आले. "आम्ही नुकतेच झोपून उठलो होतो आणि अचानक सगळं हलू लागलं, आम्ही घाबरून बाहेर पळालो," अशी आपबीती स्थानिक नागरिक मार्टेनमंडागी यांनी सांगितली.

त्सुनामीचा तडाखा आणि इशारा

भूकंपामुळे उत्तर इंडोनेशियाच्या किनारपट्टीवर त्सुनामीच्या लहान लाटा धडकल्या आहेत. अमेरिकन सुनामी चेतावणी प्रणालीनुसार, भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून १००० किमीच्या परिघात असलेल्या इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि मलेशियाच्या किनारपट्टीवर धोकादायक लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पॅसिफिक सुनामी चेतावणी केंद्राने मलेशिया, फिलीपिन्स, तैवान आणि पापुआ न्यू गिनीलाही सतर्क राहण्यास सांगितले आहे.

नुकसानीचा अंदाज सुरू

या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून मालमत्तेच्या नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. इंडोनेशियाची शोध आणि बचाव यंत्रणा सध्या बाधित भागात पोहचून परिस्थितीचा आढावा घेत आहे. किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना उंचावर जाण्याचे आणि शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुदैवाने, हवाई आणि गुआम सारख्या दूरच्या बेटांना सध्या कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

का हादरतो इंडोनेशिया?

इंडोनेशिया हा देश 'पॅसिफिक रिंग ऑफ फायर'मध्ये येतो. येथे अनेक टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना धडकतात, ज्यामुळे हा भाग भूकंप आणि ज्वालामुखीसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. यापूर्वीही इंडोनेशियाला अनेकदा मोठ्या भूकंपांचा आणि त्सुनामीचा फटका बसला आहे. 

Web Title : इंडोनेशिया में भूकंप, सुनामी से तबाही; एक की मौत, हाई अलर्ट

Web Summary : इंडोनेशिया में शक्तिशाली भूकंप और सुनामी से तबाही मची है। एक व्यक्ति की मौत हो गई है, और तटीय निवासियों को निकालने की सलाह दी गई है। टर्नेट के पास केंद्रित भूकंप से व्यापक दहशत और मामूली सुनामी लहरें उठीं। नुकसान का आकलन करने और प्रभावित क्षेत्रों को सहायता प्रदान करने के लिए खोज और बचाव अभियान जारी हैं।

Web Title : Indonesia Hit by Earthquake, Tsunami; One Dead, High Alert

Web Summary : A powerful earthquake and tsunami struck Indonesia, triggering a high alert. One death has been reported, and coastal residents are urged to evacuate. The quake, centered near Ternate, caused widespread panic and minor tsunami waves. Search and rescue operations are underway to assess damage and aid affected areas.