रशियाच्या शत्रू जमिनीवर गरजले भारताचे सुखोई ३० जेट; भारतीय पायलटनं उडवलं F15 विमान, चीन चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:10 IST2025-11-13T16:08:17+5:302025-11-13T16:10:58+5:30
भारतीय पायलटलाही F15 लढाऊ विमान चालवण्याचा अनुभव आला. एफ १५ फायटर जेट खरेदी करण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे परंतु अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही.

रशियाच्या शत्रू जमिनीवर गरजले भारताचे सुखोई ३० जेट; भारतीय पायलटनं उडवलं F15 विमान, चीन चिंतेत
टोकियो - हिंद प्रशांत क्षेत्रातील देशांमध्ये तणाव वाढत चालला आहे. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर आणि तैवानवर कब्जा करण्याच्या चिनी सैन्याच्या हालचालीमुळे युद्धाचे सावट आहे. युक्रेन युद्धामुळे चीन आणि रशिया दोघे एकत्रित आले आहेत. शी जिनपिंग सरकार पुतिन यांची उघडपणे मदत करत आहे. चीन आणि रशियाचे बॉम्बर अनेकदा जपानच्या सागरी हद्दीतून उड्डाण घेत आहेत. चीन आणि रशिया दोघेही अमेरिका आणि त्यांचा सहकारी देश जपान, दक्षिण कोरिया यांना दहशतीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनने अलीकडेच त्यांचे नवीन महाकाय एअरक्राफ्ट कॅरिअरही पहिल्यांदाच जपानच्या सागरी हद्दीत पाठवले होते. चीन आणि जपान यांच्यात सेनकाकू बेटावरून दीर्घ काळ संघर्ष सुरू आहे. तैवानवर कब्जा केल्यानंतर चीन सेनकाकूवरही ताबा मिळवू शकतो याची भीती जपानला आहे. चीनच्या या दादागिरीमुळे जपानच्या मदतीसाठी भारत समोर आला आहे. भारताचे सुखोई ३० फायटर जेट जपानला पोहचले आहेत.
जपानी सैन्याने दिलेल्या निवेदनानुसार, कोमात्सू एअरबेसवर भारतीय हवाई दलाचे सुखोई ३० एमकेआय फायटर जेटचं स्वागत आहे. भारतीय लढाऊ विमानांनी जपानी फायटर जेटसोबत ५ आणि ६ नोव्हेंबरला हवाई अभ्यास केला. त्यात भारतीय पायलटने जपानचे F15 हे लढाऊ विमान चालवले, जे दोन्ही देशांमधील विश्वासाचे संकेत मानले जातात. भारतीय सुखोई जेट जपान इंडिया डिफेन्स पार्टनरशिप प्रॉग्रॅमअंतर्गत तिथे पोहचले होते. चिनी ड्रॅगनच्या सैन्य तयारीने जपान सतर्क झाला आहे आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे, मिसाइल अमेरिकेकडून खरेदी करत आहे.
भारताच्या सुखोईमुळे चीनला मिरची झोंबली
जपानचं कोमात्सू एअरबेस जपानी वायू दलाचे F15 ईगल फायटरचे जेटचे तळ आहे. चीनने जर तैवान अथवा जपानवर हल्ला केला तर त्यावेळी हा एअरबेस खूप महत्त्वाचा ठरेल. भारत आणि जपान पायलटने २ दिवसीय हवाई धोक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सराव केला. या काळात शत्रूच्या परिसरांना आणि टार्गेटवर अचूक हल्ला करण्याचा अभ्यास केला गेला. भारतीय सुखोई ३० फायटर जेट रशियन बनावटीचे आहे. याचा रशियन वायुसेनाही वापर करते. चीननेही याची कॉपी बनवली आहे. त्यामुळे जपानी पायलटला सुखोईच्या ताकदीचा अंदाज आला असेल. त्यामुळे भविष्यात चीन अथवा रशियासोबत होणाऱ्या युद्धात हा अनुभव त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे चीनला भारताच्या सुखोईचं जपानमध्ये पोहचणे मिरची झोंबण्यासारखे आहे.
दरम्यान, भारतीय पायलटलाही F15 लढाऊ विमान चालवण्याचा अनुभव आला. एफ १५ फायटर जेट खरेदी करण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे परंतु अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. भारत रशियाकडून सुखोई ५७ फायटर जेट खरेदी करू शकते. भारताचे सुखोई ३० विमान वजनदार बॉम्ब, ब्रह्मोससारख्या मिसाइल घेऊन जाऊ शकते. अलिकडच्या वर्षांत क्वॉड सदस्य देश जपान आणि भारत यांच्यातील एअरफोर्सपासून नौदलापर्यंत सहकार्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भारतीय युद्धनौकांनीही नुकतेच जपानला भेट दिली. हा एक प्रकारचा घेराव असल्याचं चीनला वाटते.