भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:03 IST2025-05-07T15:37:17+5:302025-05-07T16:03:07+5:30
पाकिस्तानमधील पंजाबमध्ये मुख्यमंत्री मरियन नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने घेतला. रात्री १.३० वाजता भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. या अंतर्गत पीओके आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दरम्यान, आता या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताची ही कारवाई होती. या हल्ल्यात २५ भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला.
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
'भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यात २६ जण ठार झाले आहेत आणि ४६ हून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती पाकिस्तान सैन्याने दिली. भारताने हा हल्ला पंजाब प्रांत आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी संपूर्ण प्रांतात आणीबाणी जाहीर केली आहे. सरकारी निवेदनानुसार, बुधवारसाठी सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पंजाब पोलिसांसह सर्व सुरक्षा एजन्सींना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासकीय युनिट्सना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्यांना तात्काळ कामावर परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्या ठिकाणावरुन भारतात हल्ल्याचा कट रचला जायचा
मदत आणि बचाव कार्यात कोणतीही कमतरता पडू नये म्हणून नागरी संरक्षणासह सर्व संबंधित विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही बोलावण्यात आले आहे. हल्ल्यांनंतर लगेचच पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये ज्या नऊ दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले, त्या ठिकाणांवरुन भारतात दहशतवादी हल्ले रचले जात होते.