पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 23:42 IST2025-12-28T23:41:56+5:302025-12-28T23:42:53+5:30
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर मोहिमेदरम्यान भारताने पाकिस्तानातील नूर खान लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याची पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी कबूली दिली.

पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
एप्रिल २०२५ मध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवून पाकिस्तानवर हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्करी तळांचे नुकसान झाल्याची पाकिस्तान सरकारने पहिल्यांदाच जाहीरपणे कबूल केले. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
इशाक दार यांनी सांगितले की, ७ मे रोजी भारताने सुरू केलेल्या मोहिमेत रावळपिंडीतील चकलाला येथील नूर खान लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले. भारताने ३६ तासांच्या कालावधीत पाकिस्तानच्या हद्दीत एकूण ८० ड्रोन पाठवले होते. यातील ७९ ड्रोन पाकिस्तानने पाडले. मात्र, एक ड्रोन नूर खान लष्करी तळावर पडले. यामुळे लष्करी तळाचे नुकसान झाले आणि पाकिस्तानी वायु दलातील अनेक जवान जखमी झाले, असेही ते म्हणाले.
भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल कंवल जीत सिंग ढिल्लन यांनी इशाक दार यांचा दावा खोडून काढला आहे. त्यांनी पाकिस्तान मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोप केला. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानच्या ११ मुख्य लष्करी तळांना लक्ष्य केले, यात सरगोधा, रफीकी, जैकबाबाद आणि मुरीदके यांसारख्या महत्त्वाच्या हवाई तळांचा समावेश होता.
ढिल्लन काय म्हणाले?
"पाकिस्तानी मीडिया ग्रुप 'समा टीव्ही'ने १४ ऑगस्ट २०२५ रोजी १३८ सैनिकांची नावे प्रसिद्ध केली होती, ज्यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात आले. जर १३८ सैनिकांना मरणोत्तर सन्मान मिळत असेल, तर ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे किमान ४०० ते ५०० सैनिक ठार झाले असावेत. त्यांचा नूर खान तळ आगीत खाक झाला होता आणि त्याचे पुरावे पाकिस्तानी नागरिकांनीच सोशल मीडियावर दिले आहेत.", असे ढिल्लन यांनी स्पष्ट केले.