'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 15:39 IST2025-11-24T15:38:58+5:302025-11-24T15:39:31+5:30
चीनच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी या महिलेचा भारतीय पासपोर्ट 'अवैध' असल्याचे सांगत तिची चौकशी केली, कारण त्यांच्या मते अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे.

'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारी अत्यंत गंभीर घटना चीनमध्ये समोर आली आहे. चीनच्या शांघाय विमानतळावर अरुणाचल प्रदेशात जन्मलेल्या एका भारतीय महिलेला तब्बल १८ तासांहून अधिक काळ रोखून ठेवण्यात आले. चीनच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी या महिलेचा भारतीय पासपोर्ट 'अवैध' असल्याचे सांगत तिची चौकशी केली, कारण त्यांच्या मते अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे.
पेमा वांग थोंगडोक नावाच्या या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर ही माहिती दिली. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी त्या लंडनहून जपानला जात असताना शांघायमध्ये तीन तासांच्या लेओवरसाठी उतरल्या होत्या. याचवेळी चिनी अधिकाऱ्यांनी त्यांचा पासपोर्ट जप्त केला आणि त्यांना पुढील प्रवास करण्यापासून रोखले.
चीनी अधिकाऱ्यांचा धक्कादायक दावा
थोंगडोक यांच्या म्हणण्यानुसार, चिनी अधिकाऱ्यांनी त्यांचा जन्मस्थान 'अरुणाचल प्रदेश' असल्यामुळे भारतीय नागरिकत्व नाकारले. "अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे," असे अधिकाऱ्यांनी सांगितले आणि त्यांना चक्क "चिनी पासपोर्टसाठी अर्ज करा" असा सल्ला दिला. या काळात त्यांना ना जेवण देण्यात आले, ना त्यांच्या स्थितीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली.
अखेरीस, युकेमधील एका मित्राद्वारे शांघायमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्यानंतर मध्यरात्री त्यांची सुटका झाली आणि त्यांनी पुढील प्रवास सुरू केला.
थोंगडोक यांनी या घटनेला भारताच्या सार्वभौमत्वाचा थेट अपमान म्हटले असून, केंद्र सरकारने, विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित मंत्र्यांनी हा मुद्दा बीजिंगसमोर तातडीने मांडावा अशी मागणी केली आहे. अरुणाचल प्रदेशातील नागरिकांना विदेशात अशा भेदभावाचा सामना करावा लागू नये यासाठी ठोस पाऊले उचलण्याची विनंती त्यांनी केली आहे.