भारतीय वंशाचे झोहरान ममदानी यांनी दोनदा घेतली न्यूयॉर्क महापौरपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:54 IST2026-01-02T09:53:55+5:302026-01-02T09:54:27+5:30
‘त्या’ पदावर विराजमान होणारे पहिले दक्षिण आशियाई...

भारतीय वंशाचे झोहरान ममदानी यांनी दोनदा घेतली न्यूयॉर्क महापौरपदाची शपथ
न्यूयॉर्क : भारतीय वंशाचे झोहरान ममदानी (वय ३४) यांनी नवीन वर्ष सुरू होताच काही क्षणांतच येथे एका जुन्या व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मेट्रो स्थानकात आयोजित खासगी समारंभात न्यूयॉर्क शहराचे ११२वे महापौर म्हणून गुरुवारी शपथ घेतली. ते या शहराचे पहिले दक्षिण आशियाई व पहिले मुस्लिमधर्मीय महापौर ठरले आहेत.
ममदानी यांचे गुरुवारी दोन शपथविधी झाले. त्यापैकी पहिला शपथविधी एका खासगी समारंभात जुन्या सिटी हॉल मेट्रो स्थानकात पार पडला. त्याप्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि जवळची मित्रमंडळी उपस्थित होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी न्यूयॉर्क शहर प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या सिटी हॉलबाहेर ममदानी यांचा औपचारिक शपथविधी समारंभ पार पडला. व्हरमाँटचे सिनेटर बर्नी सँडर्स नव्या महापौरांना पदाची शपथ देतील.
भारतीय वंशाचे ममदानी हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर आणि कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक महमूद ममदानी यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म आणि संगोपन युगांडातील कंपाला येथे झाले. वयाच्या सातव्या वर्षी ते आपल्या कुटुंबासह न्यूयॉर्क शहरात आले. ममदानी यांनी नुकतेच २०१८मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.
बलाढ्य उमेदवारांवर मिळविला विजय
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत झोहरान ममदानी यांनी विजय मिळविला होता. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कर्टिस स्लिवा आणि राजकीयदृष्ट्या वजनदार व्यक्तिमत्व व न्यूयॉर्क राज्याचे माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांचा पराभव केला.
दरम्यान, शपथविधीसाठी जुन्या मेट्रो स्थानकाची निवड का केली, याबाबत ममदानी यांनी सांगितले की, १९०४मध्ये सुरू झालेले ओल्ड सिटी हॉल स्टेशन न्यूयॉर्कच्या २८ मूळ मेट्रो स्थानकांपैकी एक आहे. त्या शहरात कामगारांचे जीवन उत्तम व्हावे, यासाठी जे प्रयत्न झाले त्याचे हे मेट्रो स्टेशन साक्षीदार आहे.