भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 09:08 IST2025-05-14T09:08:06+5:302025-05-14T09:08:20+5:30
अनिता आनंद यांनी मंगळवारी गीतेवर हात ठेवून मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिपदी त्या कॅनडाच्या पहिल्या हिंदू महिला आहेत.

भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
काठावर सत्ता स्थापन केलेल्या कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. यामध्ये भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांना परराष्ट्र मंत्रिपदी नियुक्त करण्यात आले आहे. कार्नी हे अल्पकाळात पुन्हा सत्तेवर आले आहेत. परंतू, त्यांच्या लिबरल पक्षाला कमी बहुमत मिळाले आहे.
अनिता आनंद यांनी मंगळवारी गीतेवर हात ठेवून मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिपदी त्या कॅनडाच्या पहिल्या हिंदू महिला आहेत. आनंद यांच्यामुळे कॅनडासोबत भारताचे बिघडलेले संबंध सुधरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅनडाचे अमेरिकेसोबतही संबंध बिघडलेले आहेत. यामुळे अनिता आनंद यांना मोठी आव्हाने पेलावी लागणार आहेत.
जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानीवादींच्या प्रेमामुळे भारताशी वाकडे घेतले होते. कॅनडामध्ये जून, जुलैमध्ये निवडणूक होणार होती. परंतू त्यापूर्वीच ट्रुडो यांची लोकप्रियता घसरू लागली होती. याचा फटका बसू नये म्हणून त्यांच्या पक्षाने ट्रुडो यांना पायउतार होण्यासाठी दबाव आणला होता. ट्रुडो जानेवारीदरम्यान पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागी कार्नी यांच्याबरोबरच अनिता आनंद यांचेही नाव चर्चेत होते. परंतू, पक्षाने कार्नी यांना संधी दिली होती.
मेलानी जोली यांना उद्योग मंत्री करण्यात आले आहे. तर फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन या अर्थमंत्रीच राहणार आहेत. डोमिनिक लेब्लँक यांना व्यापार मंत्री करण्यात आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाविरुद्ध दाखवलेल्या आक्रमकतेचा प्रतिकार करण्याचे आश्वासन देऊन कार्नी यांनी ही निवडणूक जिंकली आहे. यामुळे आता कार्नी सरकारला भारताशी संबंध सुधारताना अमेरिकेशी दोन हात करावे लागणार आहेत. महत्वाचे म्हणजे कॅनडा आर्थिक संकटाशीही झुंज देत आहे.