चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:53 IST2025-07-15T15:50:28+5:302025-07-15T15:53:18+5:30
Shubanshu Shukla News: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये वास्तव्य करणारे पहिले भारतीय ठरलेले अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे १८ दिवसांच्या मोहिमेनंतर सुखरूपपणे पृथ्वीवर परतले आहेत. शुभांशू शुक्ला आणि इतर चार अंतराळवीरांना घेऊन येणारं यान भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियामधील समुद्र किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरामध्ये सुखरूपपणे उतरले.

चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये वास्तव्य करणारे पहिले भारतीय ठरलेले अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे १८ दिवसांच्या मोहिमेनंतर सुखरूपपणे पृथ्वीवर परतले आहेत. शुभांशू शुक्ला आणि इतर चार अंतराळवीरांना घेऊन येणारं यान भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियामधील समुद्र किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरामध्ये सुखरूपपणे उतरले. शुभांशू शुक्ला हे अॅक्सिओम मिशन ४ या मोहिमेचा भाग होते. त्यांनी १८ दिवस अंतराळात वास्तव्य करताना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये विविध प्रयोग केले. दरम्यान, आज स्पेसएक्सचे ग्रेस हे यान शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर चार जणांना घेऊन सुखरूप पृथ्वीवर परतले.
शुभांशू शुक्ला आणि इतर चार अंतराळवीर २५ जून २०२५ रोजी ड्रॅगन या अंतराळ यानामधून फाल्कन ९ या रॉकेटच्या मदतीने अंतराळात गेले होते. २६ जून रोजी ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये पोहोचले. तिथे शुभांशू शुक्ला यांनी ६० हून अधिक शास्त्रीय प्रयोग केले. त्यामध्ये अंतराळात स्नायूंचं होणारं नुकसान, मानसिक आरोग्य आणि अंतराळात धान्य रुजवण्यासारख्या प्रयोगांचा समावेश आहे.
#WATCH | In a historic moment, Group Captain Shubhanshu Shukla and the Axiom-4 crew aboard Dragon spacecraft splashes down in the Pacific Ocean after an 18-day stay aboard the International Space Station (ISS)
— ANI (@ANI) July 15, 2025
(Video Source: Axiom Space/YouTube) pic.twitter.com/qLAq2tyW5S
दरम्यान, कॅलिफोर्नियातील समुद्र किनाऱ्याजवळ शुभांशू शुक्ला आणि इतर अंतराळवीरांना घेऊन येणारं यान उतरल्यानंतर सर्व अंतराळवीरांना यानातून सुखरूपपणे बाहेर काढून वैद्यकिय तपासणीसाठी नेण्यात आले. आता त्यांना सुमारे १० दिवस क्वारेंटाईनमध्ये ठेवलं जाईल. यादरम्यान, त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवलं जाईल.