भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 10:58 IST2025-05-12T10:42:48+5:302025-05-12T10:58:50+5:30
पाकिस्तानचा एक अतिशय महत्वाचा एअर बेस सध्या बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धविराम ...

भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय?
पाकिस्तानचा एक अतिशय महत्वाचा एअर बेस सध्या बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धविराम असला तरी, आधी झालेल्या हल्ल्यांमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानची चांगलीच दाणादाण उडवली आहे. भारताने केलेल्या प्रत्युत्तरच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या 'रहीम यार खान' या महत्वाच्या लष्करी एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाली आहे. आता पाकिस्तानने हा एअरबेस एका आठवड्यासाठी बंद केल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानी विमान वाहतूक विभागाने शनिवारी संध्याकाळी एक नोटिस जारी केली होती. या नोटिसमध्ये असे म्हटले आहे की, एअरबेसची मुख्य धावपट्टी १० ते १८ मेपर्यंत बंद राहील. सध्या या धावपट्टीवर काही काम सुरू आहे, म्हणून ती बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. यावरूनच लक्षात येत आहे की, भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या महत्त्वाच्या धावपट्टीचे मोठे नुकसान झाल्यामुळेच आता दुरुस्तीसाठी ही धावपट्टी बंद ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
भारतीय सैन्याने दाखवली स्थिती!
रविवारी संध्याकाळी भारतीय सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेतही काही व्हिडीओ आणि फोटो दाखवले गेले, ज्यात पाकिस्तानच्या रहीम यार खान एअरबेसचे बरेच नुकसान झाल्याचे दिसले होते. पाकिस्तानच्या याच एअरबेसवर शेख झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आहे. मात्र, आता हा एअरबेस आता आठवडाभरासाठी बंद राहणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान चार दिवस संघर्ष सुरू होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला होता. यानंतर पाकिस्तानने हल्ला करण्यास सुरुवात केली. मात्र, भारतीय सैन्याने हे सगळे हल्ले परतवून लावले. प्रत्युत्तरदाखल केलेल्या हल्ल्यात भारतीय सेनेने पाकिस्तानच्या ६ लष्करी तळांवर हल्ला केला.