...तरीही भारत तेल खरेदी सुरुच ठेवेल; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 22:09 IST2018-09-27T22:07:54+5:302018-09-27T22:09:24+5:30
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी खास चर्चा केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. महत्वाचे म्हणजे दोन्ही मंत्र्यांनी अमेरिकेच्या न्युयॉर्कमध्येच सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सभेदरम्यान ही चर्चा केली आहे.

...तरीही भारत तेल खरेदी सुरुच ठेवेल; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा
नवी दिल्ली : अमेरिकेने निर्बंध लादल्याने इराणकडून तेल खरेदी बारगळण्यची शक्यता निर्माण झालेली असतानाच, इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांनी 4 नोव्हेंबरनंतरही भारत आपल्याकडून तेल खरेदी करतच राहणार असल्याचा दावा केला. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी खास चर्चा केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. महत्वाचे म्हणजे दोन्ही मंत्र्यांनी अमेरिकेच्या न्युयॉर्कमध्येच सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सभेदरम्यान ही चर्चा केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मे मध्ये इराणसोबतच्या अणुकरारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच इराणवर नवीन निर्बंध लादण्याचा इशारा दिला होता. यानुसार इराणकडून कोणत्याही देशाने तेल घ्यायचे नाही, यासाठी ट्रम्प सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे त्यांनी भारतासह इतर देशांना परिणाम वाईट होतील, असा इशारा दिला आहे.
भारतासोबतच्या आर्थिक सहकार्य आणि कच्च्या तेलाची खरेदी करण्यावर नेहमीच स्पष्टता आहे. हेच आपण स्वराज यांच्याकडून ऐकले आहे. भारतासोबतचे नाते व्यापक आहे आणि यामध्ये उर्जा सहकार्यही येते. कारण इराण भारताचा अनेक दशकांपासून महत्वाचा उर्जा पुरवठादार राहिला आहे, असेही जरीफ यांनी सांगितले.
इराण हा भारताचा तिसरा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. भारताने यंदाच इराणकडून जादा तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. तर इराणने भारताला जवळजवळ कच्च्या तेलाची फुकट वाहतूक आणि उधारी देण्याचा प्रस्ताव दिला होता. अमेरिकेने इराणवर पहिल्यांदा जेव्हा निर्बंध घातले होते, तेव्हा इराणशी संबंध ठेवणाऱ्या देशांमध्ये भारतही होता.