India Pakistan Tension Update: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजीच्या रात्री पहिला वार केला. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तान आश्रय घेणाऱ्या दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या या गोपनीय मोहिमेची अमेरिकेला आधीच माहिती होती, अशी माहिती समोर आली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहलगामजवळील बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने सीमेपलिकडे असलेल्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.
अमेरिकेला कधी कळलं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी १ मे रोजी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो यांना कॉल केला होता. जयशंकर यांनी रुबियो याना सांगितले की, भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करणार आहे आणि याबद्दल कोणताही शंका असायला नको.
पाकिस्तानलाही दिली होती माहिती
सूत्रांनी सांगितले की, ९ आणि १० मेच्या रात्री भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांवरच हल्ले केले. त्यानंतर मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि एस. जयशंकर यांना सांगितले की, पाकिस्तान चर्चा करायला तयार आहे.
वाचा >>"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
भारताने स्पष्ट केले की ही चर्चा डीजीएमओंमध्ये होईल, इतर कुणामध्येही नाही. त्यानंतर दहा मे रोजी पाकिस्तानच्या डीजीएमओंनी एक वाजता चर्चेसाठी वेळ मागितली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, पाकिस्तानच्या डीजीएमओंना ७ मे रोजी माहिती दिली गेली होती की, पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उडवले आहेत. पण, त्यांच्याकडून कोणतीही उत्तर आले नाही. भारताने पाकिस्तानी लष्कराच्या हवाई तळांवर हल्ला चढवल्यानंतर पाकिस्तानकडून चर्चेसाठी वेळ मागण्यात आला, असेही सूत्रांनी सांगितले.