कॅनडा नरमला! आक्रमक भूमिकेमुळे एक पाऊल मागे; भारतविरोधी पोस्टर-बॅनर हटवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 16:54 IST2023-09-24T16:51:08+5:302023-09-24T16:54:43+5:30
Canada-India Crisis: पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. यानंतर आता कॅनडाने एक पाऊल मागे घेतल्याचे सांगितले जात आहे.

कॅनडा नरमला! आक्रमक भूमिकेमुळे एक पाऊल मागे; भारतविरोधी पोस्टर-बॅनर हटवण्याचे आदेश
Canada-India Crisis: भारत आणि कॅनडामध्ये निर्माण झालेल्या वादामुळे सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थिती बिघडल्याचे दिसून येत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भारताने ट्रूडो यांचा दावा फेटाळून लावत आक्रमक भूमिका घेतली. यानंतर आता कॅनडाने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. भारतविरोधी पोस्टर-बॅनर हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जपानने यावर सहमती दर्शवलेली नाही. हा कॅनडासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अमेरिकेने कॅनडाची बाजू घेतली असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅनडावर दबाव असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता कॅनडाने नरमाईची भूमिका घेतली आहे.
भारतविरोधी पोस्टर-बॅनर हटवण्याचे आदेश
आता कॅनडाचा सूर मवाळ होत आहे. कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असून, कॅनडा प्रशासनाने खलिस्तानी समर्थकांनी अनेक भागात लावलेले होर्डिंग आणि बॅनर हटवण्याचे आदेश दिले आहेत. कॅनडातील एका गुरुद्वारामध्ये भारतीय राजनैतिकाच्या हत्येचे आवाहन करणारे पोस्टर्स लावण्यात आले होते. यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत हे पोस्टर्स काढले. प्रशासनाने गुरुद्वारा व्यवस्थापनाला कोणत्याही कट्टरतावादी घोषणांसाठी लाऊडस्पीकर वापरू नये, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपांनंतर कॅनडाने तेथील भारतीय दूतावासातील उच्चायुक्त पवन कुमार राय यांची हकालपट्टी केली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी भारतानेही प्रत्युत्तर देत कॅनडाच्या एका अधिकाऱ्याची हकालपट्टी केली.