अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 09:10 IST2025-09-30T09:08:14+5:302025-09-30T09:10:12+5:30
महात्मा गांधींच्या पुतळ्यावरील ही विटंबना केवळ एक गुन्हा नसून, अहिंसा, शांतता आणि समानतेच्या तत्त्वांवर हल्ला आहे असं भारताने म्हटलं.

अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
लंडन - गांधी जयंतीच्या एक दिवस आधी लंडनच्या ताव्हिस्टॉक स्क्वेअरमधील महात्मा गांधी यांच्या कांस्य पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केली आहे. या घटनेचा भारतीय उच्चायोगाने कार्यालयाने निषेध नोंदवला आहे. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असते. त्याच्या १ दिवस आधी कुणीतरी पुतळ्यावर भारतविरोधी शब्द लिहिले आहेत. हा प्रकार स्थानिक अधिकाऱ्यांना कळवण्यात आला असून उच्चायोगाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अहिंसेवरील हिंसक हल्ला अशा शब्दात भारतीय उच्चायोगाने घटनेची निंदा केली आहे.
माहितीनुसार, पुतळ्यावर 'अँटी-इंडिया' संदेश असलेली ग्रॅफिटी काढली गेली आहे तर पांढऱ्या रंगाने पुतळ्याचा चेहरे आणि हात मलिन केले आहेत. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असावी असं प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मेट्रोपॉलिटन पोलिस आणि कॅमडन काउन्सिलच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. अद्याप कोणत्याही संशयितांना अटक करण्यात आलेली नाही. भारतीय उच्चायोगाने ब्रिटिश अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. पुतळ्याला मूळ अवस्थेत परत आणण्यासाठी सहकार्य होत आहे.
तसेच महात्मा गांधींच्या पुतळ्यावरील ही विटंबना केवळ एक गुन्हा नसून, अहिंसा, शांतता आणि समानतेच्या तत्त्वांवर हल्ला आहे. आम्ही याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांसोबत संपर्कात आहोत आणि गांधी जयंतीपूर्वी पुतळा आधीसारखा होईल यासाठी प्रयत्नशील आहोत. ही घटना २ ऑक्टोबरला होणाऱ्या गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर घडल्याने त्याकडे अधिक संवेदनशीलतेने पाहिले जात आहे. १८६९ साली जन्मलेल्या गांधींच्या १५६ व्या जयंतीनिमित्त जगभरात स्मरण आणि कार्यक्रम आयोजित होत असताना ही घटना भारत-ब्रिटन संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
High Commission of India in London says, "High Commission is deeply saddened and strongly condemns the shameful act of vandalism of the statue of Mahatma Gandhi at Tavistock Square in London...The High Commission has taken this up strongly with local authorities for immediate… pic.twitter.com/LuriAJhzEb
— ANI (@ANI) September 30, 2025
या पुतळ्याचा इतिहास काय?
लंडनच्या ताव्हिस्टॉक स्क्वेअरमधील महात्मा गांधींचा हा कांस्य पुतळा प्रसिद्ध ब्रिटिश शिल्पकार फ्रेडा ब्रिलियंट यांनी घडवला असून तो १९६८ साली अनावरण करण्यात आला. ताव्हिस्टॉक स्क्वेअर हे ब्लूम्सबरी भागातील एक ऐतिहासिक उद्यान आहे, जेथे गांधींनी १८८८ ते १८९१ या काळात युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) येथे कायद्याचा अभ्यास केला होता. १९६८ नंतर हा पुतळा शांततेचे जागतिक प्रतीक ठरला असून दरवर्षी गांधी जयंतीला इथे मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. आता पुतळ्याच्या विटंबनेमुळे जागतिक पातळीवर निंदा होत आहे. भारतीय उच्चायोगाने ब्रिटिश सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली.