न्यूयॉर्क - रशियाकडून तेल आयात करण्याच्या मुद्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेले मत भारताने गांभीर्याने घ्यावे, असा सल्ला अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हेली यांनी दिला. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारताला व्हाइट हाउससोबत काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
व्यापाराशी निगडित मतभेद व रशियातून तेल आयात करण्याच्या गुंतागुंतीच्या विषयांवर दोन्ही देशांत संवादाची आवश्यकता असल्याचे मत हेली यांनी व्यक्त केले. या पोस्टसोबत निक्की हेली यांनी गत आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लेखाचा काही भाग शेअर केला.
ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लावल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर निक्की हेली यांनी भारताची बाजू घेतल्यामुळे आपल्याच पक्षातील लोकांकडून होणाऱ्या टीकेचा सामना करावा लागला होता. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने ट्रम्प त्यांना लक्ष करत असून त्यात काहीही चुकीचे नाही. कारण, या तेलातून मिळणारा पैसा रशिया युक्रेनविरोधातील युद्धासाठी निधी म्हणून वापरत आहे.
असे असले तरी भारताला चीनप्रमाणे विरोधक न मानता, एक महत्त्वाचा स्वतंत्र व लोकशाही भागीदार म्हणून त्या देशासोबत चांगले वर्तन ठेवणे गरजेचे असल्याचे हेली यांनी म्हटले आहे.